राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा मेळा जमला. यावेळी शाहरूख खान, आमिर खान, कंगना राणौत, एकता कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमात बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. तसेच, मोदींमुळेच आम्ही सर्व कलाकार कधी नव्हे त एकत्र येऊ शकलो, असे शाहरूखने म्हटले.
महात्मा गांधींच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी कलाकारांशी संवाद साधत गांधी विचारांवर चर्चा केली. चित्रपट निर्माते आनंद राय यांनी या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत आतमध्ये नेमकं काय घडलं? असं म्हणत भाजपाच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आमीर खान, शाहरूख खान हे मोदींसमेवत गांधीजींचे विचार शेअर करताना दिसत आहेत. आमीर खानने महात्मा गांधींच्या विचारांची जगाला गरज असून ते विचार जगातील सर्वच देशांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमीरने म्हटले. त्यानंतर, शाहरुख खाननेही महात्मा गांधीच्या विचारांच्या प्रचारासाठी बनविण्यात येणाऱ्या चित्रपटाचे कौतुक केले. आपण आम्हाल येथे बोलावले, त्याबद्दल आपले आभार, आम्ही कलाकार वेळेत कधीच पोहोचत नाहीत, त्यात विशेष म्हणजे एकत्रही कधीच येत नाहीत. या चित्रपटाच्या निमित्ताने, आपल्यामुळे आम्ही एकत्र आलो, असे शाहरुखने म्हटले. त्यावेळी, मोदींना महात्मा गांधींमुळे... असं म्हणताच, शाहरूखनेही महात्मा गांधींमुळे आपण एकत्र आल्याचे सांगितले. तसेच, एकमेकांच्या गळाभेटी झाल्या, आमच्यातील प्रेम वाढलं, असेही शाहरूखने म्हटले.
दरम्यान, या कार्यक्रमावर साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांच्या सूनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. उपासना ही चिरंजीवी यांचा मुलगा रामचरणची पत्नी आहे. होय, मेगास्टार चिरंजीवी यांची सून उपासना हिने ट्विटरवर मोदींना एक पत्र लिहिते आहे. मोदीजी, तुमच्या कार्यक्रमाचे निमंत्रण हिंदी कलाकारांनाच का? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. चित्रपट निर्माते आनंद राय यांनी मोदींसमवेतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.