Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 01:54 PM2023-07-11T13:54:56+5:302023-07-11T13:56:07+5:30
आता पुन्हा एकदा भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीतील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अनेक खुलासे करत आहेत. तर, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तरही देत आहेत. आपल्या पहिल्याच भाषणात छगन भुजबळ यांनी, शरद पवार हेच आमचे विठ्ठल असून आमचा राग बडव्यांबद्दलचा आहे, असे म्हणत जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.
शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमातदरम्यान आपण राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक समिती गठन करण्यात आली होती. त्या समितीने घेतलेल्या बैठकीत दोन ठराव संमत करण्यात आले होते, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच, यावेळी नेमकं काय झालं, कोणाचं भांडण झालं, हेही भुजबळांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली का?, यामुळे नाराजी होती का, असा प्रश्न छगन भुजबळ यांना पत्रकारांनी केला होता. त्यावर, उत्तर देताना भुजबळ यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला. शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या समितीत दोन ठराव झाले होते. त्यामध्ये पहिला ठराव हा, सुप्रिया सुळे यांना पक्षाचे अध्यक्ष बनविण्याचा झाला होता. मात्र, या ठरावाला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला असता, पक्षातील दोन नेत्यांनी आक्षेप घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला विरोध करत, ते प्रफुल्ल पटेल यांच्यावर तुटून पडले होते, तेव्हा किती भांडणं झाले होते, असे म्हणत भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. तसेच, जितेंद्र आव्हाड आणि पीसी चाको यांनी पहिल्या ठरावाला प्रखर विरोध केला होता, आम्ही तर त्यांचंच नाव सूचवलं होतं ना, मग आमचा त्यांच्या निवडीला विरोध असायचं काय कारण, असा प्रतिसवालही भुजबळ यांनी विचारला. तर, दुसरा ठराव हा शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहतील, असा ठराव होता, हेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी निर्णय मागे घेतला
'लोक माझे सांगाती' हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वासाने मी भारावून गेलोय. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपल्या सर्वांनी केलेली आवाहने तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतलेला निर्णय जो माझ्यापर्यंत पोहोचवला गेला, या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं सांगतच ज्येष्ठ शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.