Video: 'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोरच नारायण राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:07 AM2023-01-24T10:07:12+5:302023-01-24T10:07:32+5:30
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांसोबतच्या आठवणी सांगितल्या.
मुंबई: स्वार्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या बसवण्यात आलेल्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध राजकीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या जून्या आठवणींना उजाळा दिला.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांसोबतच्या आठवणी सांगितल्या. बाळासाहेबांनी मला अनेक पदे दिली. अनेक नेत्यांना डावलून मला मुख्यमंत्री करण्याचे धाडस बाळासाहेबांनीच केले होते, असं नारायण राणे म्हणाले. तसेच बाकीचे मध्ये येणारे मांजरीसारखे होते, आजही ते येतात, मी मांजरीची दखल घेत नाही, अशा शब्दात नारायण राणेंनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
नारायण राणेंच्या भाषणादरम्यान त्यांनी औचित्यभंग केल्याने विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. मात्र नारायण राणे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधाला न जुमानता आपले भाषण सुरुच ठेवले आणि गोऱ्हे यांना टोलाही लगावला. तसेच नीलम गोऱ्हे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगून नारायण राणे यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, नारायण राणे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
नीलम गोऱ्हे यांनी हे काय सुरुय?, किती वेळ चालणार?, असा प्रश्न राहुल नार्वेकरांना विचारला. यावर मी थांबणार नाही, असं नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर मग खाली जाऊन बोला, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. यावर देखील खाली बसून बोललेलं विधिमंडळात ग्राह्य धरलं जात नाही, असा टोला लगावला.
#LIVE : विधानभवन मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण https://t.co/16AD4Yy7UU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 23, 2023
दरम्यान, अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. ते रिमोट कंट्रोल होते, ते त्यांचा रिमोट सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी चालवायचे, स्वतःला काय हवे म्हणून ते रिमोट कंट्रोल चालवायचे नाहीत, त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वागण्यात दुटप्पीपणा नव्हता- विरोधी पक्षनेते अजित पवार
बाळासाहेबांच्या वागण्यात दुटप्पीपणा नव्हता. ते केवळ हिंदू धार्जिणे होते हे चुकीचे आहे. त्यांना सर्व धर्मांबद्दल आदर होता. सुधीर जोशींना महापौर केले तेव्हा त्यांनी मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला होता. पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांबद्दल त्यांना चीड होती, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.