मुंबई - बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. स्टारडम असलेल्या या दोन्ही सेलिब्रेटींच्या शाही विवाहसोहळ्याची देशभरात चर्चा रंगली. सोशल मीडियावरही या दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. बॉलिवूडमधील बिग कपल म्हणूनही यांची आता गणना होऊ लागली. त्यातच, कतरितासोबत लग्न झाल्याने विकी कौशलचाही भाव चांगलाच वधारला आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच भाव खाऊन गेल्याचं एका व्हिडिओतून दिसून आलं.
कतरिना आणि विकी कौशल यांचा विवाहसोहळा जयपूर येथे धुमधडाक्यात पार पडला. त्यासाठी, मुंबई-जयपूर-मुंबई असा विमानप्रवास या जोडप्यानं केला. मुंबईहून जयपूरला जाण्यासाठी विकी कौशल मुंबई विमानतळावर आला होता. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विमानतळावरुन बाहेर जात होते. कतरिना भावी पती आणि अभिनेता विकी कौशलही अजित पवार यांच्या रुबाबपुढे झाकाळून गेला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुंबई विमानतळावरुन 6 डिसेंबर रोजी जयपूरला रवाना होण्यापूर्वी विकी कौशल विमानतळाच्या प्रवेशद्वाराने आत जात होता. विकी आणि कतरिनाची लोकप्रियता पाहता त्यांना विमानतळावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणे सहज होते. विमानतळावर छायाचित्रकार या जोडप्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. मात्र, त्याचवेळी विमानतळातून मोठा फौजफाटा आणि तगडा बंदोबस्त घेऊन अजित पवार आले. विकी कौशलने चाहत्यांना हात दाखवून आतमध्ये जाताना, अजित पवार बाहेर येते होते. त्यावेळी, सुरक्षा ताफ्यातील एका जवानाने विकी कौशलला बाजूला होण्यास सांगितले. अजित पवारांच्या तो थाट पाहून विकी कौशलही आपसूकच बाहेर फेकला गेला. बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं स्टारडम उपमुख्यमंत्र्यासमोर फिकं पडलं अन् विकी कौशल झाकाळला गेला.