मुंबई: शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार अशा घडामोडी सुरू असतानाच आज राजभवनातून मोठी घडामोड समोर आल्याने सर्वांना धक्काच बसला. भाजपाने सत्तास्थापेसाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपानेराष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन सत्तास्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीच युती करणार नाही असल्याचे सांगत आहे. एक वेळ रिकामे राहू, सत्तेशिवाय राहू असं त्यांनी म्हणलं आहे. तसेच मी अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे ते सांगत आहे. तसेच 26 सप्टेंबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीही भाजपा युती होणार नाही. आम्ही त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला असल्याचा उल्लेख देखील त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे' असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांना याबाबतची कल्पना होती का, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.
दरम्यान, प्रत्येक पक्षाने निर्वाचित आमदारांची सही घेऊन त्यांची यादी गटनेत्यांकडे ठेवल्या होत्या. यातील यादी विधिमंडळ नेते म्हणून अजित पवारांनी यादी घेतली. यातील २ यादी कार्यालयातून घेऊन अजित पवार कदाचित भाजपाला पाठिंबा देण्यासाठी गेले असावेत, ५४ आमदारांचा पाठिंबा आहे असं भासविण्यात आलं. राज्यपालांचीही फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. त्याचसोबत भाजपाला बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून बहुमत सिद्ध करु, शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होईल, आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र राहणार, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ४ वाजता होणार आहे. त्यात नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे असं शरद पवारांनी सांगितले.