ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 7 - पालिका निवडणुकीअाधीच मतदारांना पैसे वाटत असल्याची एका उमेदवाराची व्हिडीओ क्लिप गोवंडी परिसरात व्हायरल झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा विरोधी उमेदवाराचा डाव असल्याची प्रतिक्रिया या महिला उमेदवाराने दिली आहे.गोवंडीतील प्रभाग क्रमांक १४० मध्ये समाजवादी पार्टीकडून आयशा शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तात्काळ प्रचाराला सुरुवात केली. दरम्यान याच परिसरात काही मतदारांना ही महिला उमेदवार पैसे वाटत असल्याची व्हिडीओ क्लिप मंगळवारी व्हायरल झाली. तसेच ही व्हिडीओ क्लिप अनेक सोशल साईडवर देखील व्हायरल झाल्याने दिवसभर या ठिकाणी या माहिलेचीच चर्चा होती. आयशा शेख या दोन वेळा काँग्रेस पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु त्यानंतर एकदा त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीचा झेंडा हाती घेतला. पालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग १४० हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर त्यांना या विभागातून समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली आहे. सध्या त्यांचा गौतम नगर विभागातील मतदारांचा पंधरा हजार रुपये देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्या मतदारांना देवासाठी पंधरा हजार रुपये देते मी तुमचा शब्द पाळते. तुम्ही माझा शब्द पाळा, असे आवाहन ते उमेदवारांना करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. याबाबत एका पार्टीच्याच महिला उमेदवाराने याबाबत पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडे याची लेखी तक्रार केली आहे. मात्र विरोधकांचे हे षड्यंत्र असल्याचा पलटवार शेख यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत देवनार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी आयशा शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
VIDEO- गोवंडीत समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची पैसे वाटपाची क्लिप व्हायरल
By admin | Published: February 07, 2017 9:28 PM