CSMTवरील व्हिडीओ तुफान व्हायरल; लोकल प्रवासात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 09:51 PM2020-06-19T21:51:33+5:302020-06-19T21:52:05+5:30
यासंदर्भातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई : दोन प्रवाशांमध्ये अंतर राहण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकात वर्तुळे तयार केली आहेत. प्रवासी या वर्तुळात रांगेत उभे राहून लोकलची वाट बघत असतात. यासंदर्भातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, लोकलमधील फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन कायम होत असल्याचे दिसून येत आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकावर वर्तुळे, लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी दिशादर्शके स्थानकावर तयार केली आहेत. यातून स्थानकांवर चिन्हांकीत करण्यात आलेल्या जागेवरच प्रवासी उभे असल्याचे दिसून आले. यासंदर्भातील सीएसएमटीवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक जण या व्हिडिओतील दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, रेल्वेच्या डब्यांमध्ये आणि तिकीट खिडक्यांवर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सध्या मध्य रेल्वे मार्गावर दररोज २०० तर पश्चिम रेल्वे मार्गांवर १६२ लोकल फेऱ्या सुरू आहे. १२ डब्यांच्या एका लोकल मध्ये ७०० प्रवाशांचीच वाहतूक करण्याचे निर्देश रेल्वेने दिले आहे. त्याप्रमाणे सुमारे एका ५९ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा आहे. मात्र, प्रत्येक डब्यांमध्ये दुप्पट प्रवासी दिसत असून उभ्याने सुद्धा प्रवास केला जात आहे. त्यामूळे फिजिकल डिस्टन्सिंगनच्या नियमांचे उल्लंघण होताना दिसून येत आहे.
--------
सर्वाधित कर्मचारी हे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा येथून येतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी जादा लोकल फेऱ्या सोडणे आवश्यक आहे. फलाटावरील व्हिडिओ फोटो प्रसिद्ध रेल्वे प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. माञ लोकलमध्ये प्रवास करताना गोंधळ उडतो आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण अचानक वाढू शकतात.
- लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
--------
२०० फेऱ्या आणि प्रत्येक लोकलमध्ये ७०० प्रवासी
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. स्थानकावर वर्तुळे, दिशादर्शके तयार केली आहेत. मध्य रेल्वेच्या २०० फेऱ्या धावत आहेत. प्रत्येक फेरीतुन ७०० प्रवाशांनी प्रवास करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रवाशांनी एकाच डब्यात गर्दी करू नये.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे