Video: अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया सुळेंना विचारला प्रश्न; खासदाराने दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 08:24 AM2022-06-12T08:24:00+5:302022-06-12T08:38:46+5:30
अकेला देवेंद्र क्या करेगा, असं तुम्हीच म्हणाला होतात. त्यावर, सुप्रिया सुळेंनीही स्पष्टपणे उत्तर दिलंय.
मुंबई - राज्यसभा निवडणुकीत 6 पैकी 3 जागा जिंकत भाजपने सर्वांना धक्का दिला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय पवार यांचा आश्चर्यकारक पराभव झाल्यानंतर सर्वत्र भाजपच्या रणनितीचं कौतुक होत आहे. मैदान दिल्लीचे, दोन्ही मल्ल कोल्हापूरचे आणि जिंकले मात्र भाजप आखाड्याचे वस्ताद देवेंद्र फडणवीस... अशीच काहीशी कुस्ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिली. कारण, धनंजय महाडिक यांना विजयी करण्यात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. गेल्या अनेक राजकीय डावपेचात फडणवीस सरस ठरत आहेत. त्यावरुन, खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलेल्या प्रश्नावरुन फडणवीस सोशल मीडियावर वस्ताद ठरत आहेत.
सुप्रिया सुळेंनी भाजपला विजयाबद्दल शुभेच्छाही दिल्या. यावेळी, पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना कळीचा प्रश्न विचारला. भाजप समर्थकांकडून विजयानंतर सुप्रिया सुळेंचा तो प्रश्न आशय स्वरुपात व्हायरल केला जातो. तसेच, अकेला देवेंद्र क्या करेगा... असे म्हणत त्यांच्या चाणाक्ष्य बुद्धीची आणि राजकीय विजयाची गणितं शेअर केली जातात. आता, यासंदर्भात स्वत: सुप्रिया सुळेंनाच पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. अकेला देवेंद्र क्या करेगा, असं तुम्हीच म्हणाला होतात. त्यावर, सुप्रिया सुळेंनीही स्पष्टपणे उत्तर दिलंय. मी म्हणाले ते बरोबरच आहे, मग चंद्रकांत दादांनी काल काहीच नाही का केलं? दॅट्स ना फेअर, हा टिम इफर्ट आहे, असे प्रत्यु्त्तर देत आपण आपल्या विधानावर कायम असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत आम्हाला मिळाले नाही, याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’, असे म्हणत झालेल्या पराभवाने एखादं गोष्ट अशी घडतेच, असंच सुळे यांनी सूचवलं.
आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
शरद पवारांकडून कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. भाजपने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसे आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आले आहे. राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटामध्ये फरक पडलेला नाही. आमच्यातील कोणीही फुटलेले नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळाले ते एका अपक्ष आमदाराचे होते. त्या अपक्ष आमदाराने मला सांगूनच तसे केले होते, असे शरद पवार म्हणाले.
संभाजीराजेंमुळे कौल्हापूरचे मैदान चर्चेत
संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत लढाईची तलवार उपसली आणि तेव्हापासूनच कोल्हापूर या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले. या विजयाने फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रात बहुजन समाजातील नेतृत्व भाजपमध्ये तयार केले. भाजप महाडिक यांना केंद्रात मंत्रिपदही देऊ शकतो. या कुस्तीत झालेल्या खडाखडीचे, डाव-प्रतिडावाचे पडसाद आगामी राजकारणात उमटणार आहेत.