आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पुढील काही महिन्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी या लोकसभेची रंगीत तालिम म्हणून होत असलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने जोरदार प्रचार आणि प्रसार सुरू केला असून मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखाच जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री जनतेत मिसळून लोकसंपर्कातून मोदींचा प्रचार करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही रत्नागिरीत लोकांच्या मनातील भावना जाणून घेतल्या.
चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या राज्यभर दौरे करत असून भाजपाच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. रत्नागिरीमध्येही त्यांनी रस्त्यावर उतरुन जनतेशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी, काहींना आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होईल, असा प्रश्न केला. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान कोण व्हावं, असं तुम्हाल वाटतं, असा सवाल बावनकुळे यांनी केला होता. त्यावर, एका युवकाने राहुल गांधींचं नाव घेतलं. आपल्या तोंडांसमोरच तरुणाने राहुल गांधींचं नाव घेतल्याने भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलले. त्यावेळी, त्यांनी शांतपणे प्रतिक्रिया देत, ४५० पैकी एकजण राहुल गांधींच्या पसंतीचा आहे, असे म्हणत त्या युवकाचे धन्यवाद मानले. मात्र, या तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला होता.
भाजपा प्रदेशाध्यक्षांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियातून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही हा व्हिडिओ शेअर करत, सुनिए जनता के मन की बात... असे कॅप्शन दिलं आहे. तर, काँग्रेसच्या सचिन सावंत यांनीही ते ट्विट रिट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. वारं वेगानं वाहतंय बावनकुळेजी, टोपी सांभाळून ठेवा. राहुल गांधींचं वादळ येत आहे, असे ट्विट सचिन सावंत यांनी केलंय. सावंत यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, काँग्रेस समर्थकांकडूनही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे.