मुंबई - आपल्याशी ज्या महिलेचे संबंध जोडले जात आहेत त्या महिलेचे दाऊद गँगशी आणि पाकिस्तानशी संबंध आहेत. माझी बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. युवा सेना जाणीवपूर्वक त्या महिलेला पाठीशी घालत आहे, असा आरोप शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. तसेच, या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता, संबंधित महिलेने समाजमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे. तसेच, मी भारमातेची कन्या असून मला आणि देशाला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं तिने म्हटले आहे.
माझ्या विरोधात तक्रार करणारी महिला ही व्यावसायिक तक्रारदार आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबावर याआधीही अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल आहेत. या महिलेला सार्वजनिकरीत्या व्यासपीठावर आणले गेले हे गंभीर आहे. यामागे युवा सेना आणि राष्ट्रवादीचे कारस्थान आहे, असे राहुल शेवाळेंनी आरोप केले होते. आता, या महिलेने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत राहुल शेवाळेंवरच गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिला दिल्लीची असून राहुल शेवाळेंनी मला शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचं संबंधित महिलेनं म्हटलं आहे. मी माझे करिअर दुबईमध्ये बनवलं असून मी फॅशन डिझाईनर आहे. दुबईत माझे अमेरिकन, पाकिस्तानी, बांग्लादेशी मित्र राहिले आहेत. पण, माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असेही महिलेनं म्हटलं आहे.
मी भारतमातेची कन्या असून माझ्यावर राहुल शेवाळे यांनी निराधार, बिनबुडाचे आरोप केले आहेत. शेवाळे यांनी केवळ मला भारतमातेच्या कन्येलाच नाही तर भारत देशाला बदनाम केलंय. देशातील कुठल्याही व्यक्तीला माझ्या मोबाईलचे सीडीआर आणि माझा व्हिजा-पासपोर्ट पाहायचा असेल, त्यावर कराचीचा व्हिजा पाहायचा असेल तर ह्या दोन्ही घटना पाहता येतील, असे पीडित महिलेने समाजमाध्यमांसमोर येऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता राहुल शेवाळेंच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे दिसून येते.
राहुल शेवाळेही दुबईत येते होते, तेव्हा ते कुठे जायचे, कोणाला भेटायचे, त्यांचे कोणाशी संबंध आहेत. याचाही तपास करायला हवा, असे म्हणत राहुल शेवाळेंच्या आरोपावरुन बूमरँग केलं आहे.