मुंबई - जागतिक महिला दिनी महिलांच्या व्यथा आणि कथा नेहमीच वर्तमानपत्रांतून जगासमोर येतात. बातम्या-लेख प्रसिद्ध होतात. कुणी कविता करतं, कुणी सिनेमातून वास्तव मांडतं. मात्र, गली बॉय चित्रपट आल्यानंतर सध्या डिजिटल मीडियात रॅप साँगची असलेली क्रेझ विविध प्रश्नांना हाताळत आहे. रॅप म्हणजे तसाही बंडखोर आवाज, बंड करणारे, व्यवस्थेविरोधात पेटून उठणारे शब्द. हाच रॅप आता महिलांच्या हक्कासाठी बोलू लागलाय, महिलांच्या बंधनाविरुद्ध गाऊ लागलाय. महिलांना मुक्तपणे वावरू द्या, असे म्हणत नारीजात या टायटलने हे रॅप साँग बनवलंय.
शेतकऱ्यांचं दु:ख आपल्या रॅपमधून मांडणाऱ्या अजित शेळकेने नारीजात नारीजात... असे म्हणत महिला दिनी आता महिलांच्या प्रश्नावर भाष्य केलंय. नारीजात नारीजात... भारी जगावर पडेल, करा मोकळे तिचे हात असे या रॅपसाँगचे बोल आहेत. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अजितने महिलांवर होणारे अत्याचार, महिलांवर लादण्यात आलेली बंधने याची व्यथा आपल्या रॅपसाँगमधून मांडली आहे. तसेच, महिला कुठल्याही संकटांना सामोरे जाऊन परिस्थिती हाताळत आहेत, फक्त त्यांना आपण संधी दिली पाहिजे, असेच अजयने सुचवलंय.
विशेष म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एवढं जबरदस्त रॅप केलंय. भगवंत इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरींगमधील अजित शेळके याने हे रॅप लिहिलं आहे. तर, मेल आवाजात गायनाचं कामही त्यानेच केलंय. तर, फिमेल आवाजात वर्षा आहेरकर, काजल मस्के आणि वैष्णवी मगर यांनी हे रॅप गायलंय. या रॅप गाण्याचं बहुतांश शुटींग हे पंढरपूर आणि बार्शी परिसरात झालं आहे. जॅक गायकवाड यांनी गाण्याच्या रिलीजसाठी मोठी मदत केली आहे.
असे म्हणत तिच्यावर बंधन लादण्यापेक्षा तिच्या नजरेनं तिला जग बघू द्या, असेच या रॅपमधून सूचवलंय. यापूर्वीही अजित शेळकेने रॅप साँगच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व्यथा मांडली होती. सांगा शेती करू कशी.... पोटाची खळगी भरू कशी... हे रॅप सोशल मीडियावर प्रचंड गाजलं होतं. मोठ्या प्रमाणात हे व्हायरलही झालं होतं. त्यानंतर, आता महिलांचा विषय घेऊन हे रॅप बनवलंय.