Video: धावत्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, तेवढ्यात महिला कॉन्स्टेबल आली अन्
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:18 AM2021-10-22T09:18:26+5:302021-10-22T09:19:39+5:30
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: तुम्ही अनेकदा रेल्वेमध्ये चढताना प्रवासी पडल्याच्या घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना मुंबईतीलरेल्वे स्टेशनवर झाली. पण, यावेळी एका महिला कॉन्स्टेबलने चपळाईने महिलेचे प्राण वाचवले. गुरुवारी(21 ऑक्टोबर) मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका 50 वर्षीय महिलेचा पाय घसरला आणि ती रेल्वेखाली जाणार होती. तेवढ्यात रेल्वे प्रोटेक्शन फोर्स(RPF) च्या एका महिला कॉन्स्टेबलने अतिशय चपळाईने त्या महिलेचा जीव वाचवला. मुंबईच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनवर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
सीसीटीव्हीत दिसत आहे की, मुंबईच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनवर महिला ट्रेनमध्ये चढत असताना अचानक ट्रेन सुरू होते आणि त्या महिलेचा पाय घसरून ती खाली पडते. ती रेल्वेखाली जाणार, तेवढ्यात समोर असलेली आरपीएफची महिला कॉन्स्टेबलने धावत येऊन त्या महिलेला बाजूला खेचून तिचा जीव वाचवते. आरपीएफकडून या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. तसेच, महिला कॉन्स्टेबलचे कौतुकही केले आहे.
महिला कॉन्स्टेबल सपना गोलकर यांनी वेळीच कारवाई केली नसती, तर ती महिला घसरु प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतरात पडली असती. कॉन्स्टेबल गोलकर यांच्या धाडसी कृतीसाठी रेल्वे संरक्षण दलाने त्यांचे कौतुक केले आहे. आरपीएफने एका ट्विटमध्ये म्हटले आहे, "आरपीएफ कॉन्स्टेबल सपना गोलकर तिच्या साहसाने चमकली. तिने मुंबईच्या सँडहर्स्ट स्टेशन (एसईसी) वर चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या एका महिलेला रेल्वेखाली जाण्यापासून वाचवले."