विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:07 AM2022-06-10T09:07:14+5:302022-06-10T09:08:13+5:30

Vidhan Parishad Election 2022: प्रवीण दरेकरांनी आता मजूर नसल्याचे म्हटले असून, प्रसाद लाड यांनी जवळपास ४ कोटींचा कर भरलेला नसल्याचे सांगितले जात आहे.

vidhan parishad election 2022 prasad lad assets over 152 crore and pravin darekar property over 7 crore | विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ!

विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ!

googlenewsNext

मुंबई: देशातील राज्यसभेनंतर राज्यातील विधान परिषदेतही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election 2022) भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांना दिल्यानंतर त्यांनी आपापले अर्ज भरले. यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून या उमेदवारांच्या संपत्तीविषयी माहिती मिळाली आहे. 

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर म्हणून नोंद करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या संपत्तीमध्ये गेल्या सहा वर्षांत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. विविध स्वरूपांचे १४ गुन्हे दाखल असलेल्या दरेकर यांची मालमत्ता सुमारे साडेसात कोटींवर पोहोचली. तर, प्रसाद लाड तब्बल १५२ कोटींचे मालक असल्याचे निवडणूक अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. आपण मजूर असल्याचा दावा करीत मजूर गटातून मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवून कालांतराने बँकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित करणाऱ्या दरेकर यांनी यावेळी आपण व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

प्रवीण दरेकर यांची संपत्ती आता ७ कोटी ४६ लाखांपेक्षा अधिक

सहा वर्षांपूर्वी दरेकर आणि त्यांच्या कुटुंबियांची मिळून एक कोटी ८१ लाखांची जंगम तर २ कोटी २९ लाखांची स्थावर अशी सुमारे ४ कोटींची संपत्ती होती. दरेकर यांची संपत्ती आता ७ कोटी ४६ लाखांपेक्षा अधिक आहे. आपल्यावर विविध ठिकाणी १४ गुन्हे दाखल असून, त्यातील अनेक गुन्हे राजकीय आंदोलनातील आहेत, तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच दरेकर यांची जंगम मालमत्ता एक कोटी २५ लाखांची असून त्यामध्ये ४२५ ग्रॅम सोने, बँका, वित्तीय संस्थांमधील ठेवींचा समावेश आहे. दरेकर यांची स्थावर मालमत्ता २ कोटी ३० लाख तर पत्नीची ४ कोटी १८ लाखांची आहे. यात मुंबईतील घरे, व्यापारी गाळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर शिवसह्याद्री पतपेढीचे २९ लाखांचे कर्जही आहे.

प्रसाद लाड यांची संपत्ती घटली

भाजपचे उमेदवार  प्रसाद लाड मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच क्रिस्टल कंपनीचे संचालक आहेत. गेल्या वेळी विधान परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ मिळालेल्या लाड यांची मालमत्ता २०१ कोटींची होती. पाच वर्षांत यात घट होऊन १५२ कोटी झाली आहे. प्रसाद लाड यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांची जंगम मालमत्ता ३२ कोटी ५९ लाख तर पत्नीची ५४ कोटी ६५ लाख तर हिंदू अविभक्त कुटुंबाची ७४ लाखाची संपत्ती आहे. त्यामध्ये दोन हजार २४ ग्रॅम सोने, १२ महागडी घडय़ाळे, हिरे, चांदी आदींचा समावेश आहे. तर ६४ कोटी ४६ लाखांची स्थावर मालमत्ता असून त्यामध्ये प्रसाद लाड यांची ३०कोटी ९१ लाख तर पत्नीची २९कोटी १५ लाखांच्या स्थावर संमत्तीचा समावेश आहे. यामध्ये घरे, व्यापारी गाळे तसेच जमिनीचा समावेश आहे. विशेष म्हणजे लाड यांनी तीन कोटी ६७ लाखांचा प्राप्तिकर भरलेला नसून हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे वादात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 
 

Web Title: vidhan parishad election 2022 prasad lad assets over 152 crore and pravin darekar property over 7 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.