Join us

“फडणवीसांच्या विनंतीला मान, वारंवार माघार घेणार नाही”; विधान परिषदेवरुन राज ठाकरे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 11:18 AM

Vidhan Parishad Election 2024: निरंजन डावखरेंनी भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक विनंती केली होती. त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले.

Vidhan Parishad Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारण तापताना दिसत आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. 

मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, दुसरीकडे भाजपाने निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघात मनसे आणि भाजपा आमनेसामने येणार का, याकडे लक्ष लागले होते. भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या मतदारसंघातून माघार घेण्याबाबत विनंती केली होती. अखेरीस राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 

निरंजन डावखरे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या निरंजन डावखरे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या निवडणुकीत महायुती एकत्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे महायुती एकत्र राहील, असा मला विश्वास आहे, असे निरंजन डावखरे यांनी सांगितले. 

फडणवीसांच्या विनंतीला मान, वारंवार माघार घेणार नाही

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर पुन्हा त्यांची दोनदा चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक विनंती केली होती की, विधानपरिषद निवडणुकीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाने डावखरेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अभिजीत पानसेंनी माघार घ्यावी. देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान देत राज ठाकरेंनी निर्णय घेतला की, अभिजीत पानसे अर्ज भरणार नाहीत. निरंजन डावखरेंनी राज ठाकरेंचा आशीर्वाद घेतला. पाठिंब्याबद्दल राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अशी गोष्ट वारंवार होणार नाही. कारण आमचाही स्वतंत्र पक्ष आहे. राजकारणात बऱ्याच गोष्टी घडत असतात. ज्याचा पक्षाला होणारा फायदा कालांतराने दिसतो. निवडणुकीची तयारी खूप चांगली झाली होती. असे असले तरी देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान देत माघारीचा निर्णय घेतला. पक्षाला याचा फायदा नजीकच्या काळात दिसेल, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी सरदेसाईंसह अविनाश जाधव, अभिजीत पानसे, भाजपा नेते प्रसाद लाड उपस्थित होते. 

टॅग्स :विधान परिषद निवडणूकमनसेराज ठाकरेभाजपादेवेंद्र फडणवीसनिरंजन डावखरे