मुंबई - निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाची वेळ तीन तासांनी वाढवली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत उद्धवसेनेकडून अर्ज करण्यात आला होता.
मतदानाचा कालावधी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होता. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.
उद्धवसेनेचे उमेदवार ॲड. अनिल परब यांनी २८ मे रोजी आयोगाला पत्र लिहून मतदारांसाठी वेळ योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बहुतेक मतदार हे नोकरदार वर्गातील असून ते नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा मतदान करण्यास प्राधान्य देतात, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.