मुंबई : धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत हे दोघे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या २ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी धनंजय मुंडे यांच्या जागेवर भाजपाकडून राजन तेली यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. उद्या तेली उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते.
धनंजय मुंडे हे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून गेले होते. पुढे ते विरोधी पक्षनेते झाले. मात्र, अलिकडेच ते परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधान परिषद जागेसाठीची निवडणूक २४ जानेवारीला होईल. मुंडे हे राष्ट्रवादीचे असल्याने या जागेवर राष्ट्रवादीच उमेदवार जाहीर करणार आहे.
राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे माजी राज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. शिवसेनेसोबत युती असल्याने तेली यांनी आधी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र, नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाने शिवसेनेविरोधात रसद पुरविली होती. यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी तेली यांचा जोरदार प्रचार केला होता. सावंतवाडी, वेंगुर्ला हा मतदारसंघ गोव्याच्या सीमेला लागून असल्याने भाजपा नेहमीच तेथील मुख्यमंत्र्यांना प्रचार करण्यासाठी पाठविते. मात्र, युती असूनही भाजपाने तेली यांचा प्रचार केल्याने केसरकर नाराज झाले होते.
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी २४, ३१ जानेवारीला निवडणूक
तर तानाजी सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त जागेसाठी ३१ जानेवारीला निवडणूक होणार आहे. मुंडे यांची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे ती राष्ट्रवादीकडेच राहील. महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये मात्र शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होऊ शकते.