मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत निर्माण झालेला गुंता सुटला असून राज्यात तीन आठवड्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि सत्तापेच संपला आहे.या निवडणुकांबाबत आज आयोगाची बैठक झाली. तासाभराच्या बैठकीनंतर आयोगाने निवडणुकीला हिरवा कंदील दाखवला. मात्र, कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध काटेकोर पाळण्याचे निर्देशही दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. नियमानुसार शपथविधीनंतर सहा महिन्यांत सदस्य बनणे बंधनकारक आहे. त्यामुळे २७ मे २०२० पूर्वी विधान परिषदेची ही निवडणूक पार पडणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या नऊ जागा भरण्याची विनंती केली होती. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही आयोगाला पत्र पाठविले होते.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांच्यात साधारण वीस मिनिटे चर्चा झाली.या निवडणुकीसाठी ४ मे रोजी अधिसूचना जारी होईल. ११ मेपर्यंत अर्ज भरता येतील. १२ मे छाननी आणि १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास २१ मे रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान. त्यानंतर पाच वाजल्यापासून मतमोजणी होईल.
Vidhan Parishad Election :उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 6:04 AM