- अतुल कुलकर्णी
प्रिय आमदार बंधू नमस्कार, जून महिना आपल्यासाठी भलताच लकी ठरला आहे. मुंबईतल्या विविध पंचतारांकित हॉटेलची सैर आपल्याला करायला मिळत आहे. कधी राज्यसभेच्या निवडणुका तर कधी विधान परिषदेच्या... मतदानाच्या नावाखाली आपल्याला आपापले पक्ष पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जात आहेत. तिथे जेवणावळी घडत आहेत. आपले विशेष लाड केले जात आहेत. आपण खूप भाग्यवान आहात. शेवटी आपण जनतेचे सेवक आहात. आपण जी सेवा करता, त्यांच्यासाठी जे अपार कष्ट करता, त्याचे फळ आपल्याला मिळायलाच हवे. त्यामुळे चार दिवस आपण पंचतारांकित हॉटेलात जीवाची मुंबई केली तर बिघडले कुठे..? टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका... त्यांचे काम तेच असते..! राज्यसभा निवडणुकांच्या वेळी तुम्हाला काय कमी टेन्शन होते का..? कोणत्या पक्षाची किती मते? कुठे द्यायची? कशी द्यायची? कोणाला दाखवायची? याची रंगीत तालीम आपल्याकडून घेतली गेली. प्रत्येक पक्षाने ही रंगीत तालीम केली. त्याचे फोटो, बातम्या सगळीकडे पाहायला मिळाल्या. एवढे करूनही तुमच्यातल्या काही जणांनी मतांची फिरवाफिरवी केलीच. त्यांना नेमकी कसली तालीम मिळाली होती, याचा शोध आता पुढील काही काळ घेतला जाईल... कोणीतरी सांगत होते की, काही आमदारांच्या स्वप्नात गांधीजी आले...! त्यांनी दृष्टांत दिला...! त्यामुळे त्या आमदारांनी त्यांच्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान केले. गांधीजीदेखील गालातल्या गालात हसले आणि आमदार महोदयही गांधी विचाराने प्रसन्न झाले ! अशा बातम्या येत आहेत. त्याकडे तुम्ही फारसे लक्ष देऊ नका. तुम्ही पंचतारांकित हॉटेलचा आनंद घ्या. तिथे महागडे रंगीत पाणीदेखील मिळते. शिवाय खाण्याचे वेगवेगळे पदार्थ मिळतात. त्याचा आस्वाद घ्या. मतदारसंघात फिरताना लोक अर्धा कप चहा पाजतील आणि ५० कामं सांगतील. इथे असं होणार नाही. इथे ५० वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील आणि एकच मत द्या, असं सांगितलं जाईल, त्यामुळे या सगळ्यांचा आनंद घ्या... मतदारसंघ रोजचाच आहे..!सध्या पावसाने पाठ फिरवली आहे. लोक धूळपेरणी करून पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस आला नाही तर पेरणी वाया जाईल. त्यामुळे अशा काळात मतदारसंघात फिराल तर लोक तुम्हाला बियाण्यांसाठी मदत मागतील. खत मिळवून द्या, असं सांगतील. या कटकटीपेक्षा काही दिवस पंचतारांकित हॉटेलात राहा. तिथे एसी रूम आहेत. जेवणाचे हॉलही एसी असतात. त्यामुळे आनंदाने राहा. ग्रुप करून पत्ते खेळा. मतदार संघात या गोष्टी करता येत नाहीत. कोण जास्त रंगीत पाण्याचे ग्लास रिचवतो. त्याची स्पर्धा घ्या. पंचतारांकित हॉटेलमध्ये मतदानाच्या निमित्ताने जे मुक्काम होतात ते खूप आनंददायी असतात. हे आम्ही तुम्हाला काय सांगायचे..? अर्थात काही जणांना अपक्षांविषयी हेवा वाटत असेल. आपणही अपक्ष म्हणून निवडून आलो असतो तर बरे झाले असते, असेही तुमच्यापैकी काही जणांना वाटेल. अपक्षांनी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात मुक्काम न करता, राज्यसभा निवडणुकीत जो काही आनंद ‘कमावला’ त्यामुळे तुम्हाला मात्र दुःख झाले असेल. फार वाईट वाटून घेऊ नका... पुढच्या वेळी तुम्हीदेखील अपक्ष उभे राहा, म्हणजे तुम्हालाही असाच आनंद ‘कमावण्याची’ संधी पाच वर्षांत एकदा तरी नक्की येईल... ही एक संधी म्हणजे पाच वर्षांची बेगमी आहे, असे समजून त्याचा फायदा घ्या. ज्यांनी राज्यसभेच्या वेळी हा आनंद ‘कमावला’ त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निमित्ताने तसाच आनंद ‘कमावण्याची’ संधी चालून आली आहे..! यावेळी तर गुप्त मतदान आहे. राज्यसभेला मत दाखवावे तरी लागत होते, यावेळी तेही दाखवण्याची गरज नाही. त्यामुळे गांधीजीदेखील अनेकांना सामूहिक दृष्टांत देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानिमित्ताने अनेकांची गांधींवरील श्रद्धा वाढेल..! गांधी दर्शनाने त्यांचे विचार समृद्ध होतील..! आपणही अशी संधी घ्यायला हरकत नाही. नाहीतरी तुमचे मत कोणाला दिसणार नाही... त्यामुळे तुम्हीदेखील थोडाबहुत आनंद ‘कमावता’ आला तर घ्या कमावून...! त्यामुळे पुढची निवडणूक तरी थोड्याफार आनंदात पार पडेल..! ते शक्य झाले नाही तर खा... प्या... मजा करा...तुमचाच बाबूराव