Vidhan Parishad Election : सेना, काँग्रेसची किती मते फुटली? दोन्ही पक्षांचे आमदार होते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:17 AM2022-06-22T11:17:58+5:302022-06-22T11:18:49+5:30
Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकताना शिवसेना व काँग्रेसचीही मते मोठ्या प्रमाणात घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते. दोन्ही पक्षांचे काही आमदार गेले काही दिवस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकताना शिवसेना व काँग्रेसचीही मते मोठ्या प्रमाणात घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते. दोन्ही पक्षांचे काही आमदार गेले काही दिवस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसची स्वत:ची ४४ मते असताना चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोन्ही उमेदवारांना मिळून ४१ पहिल्या पसंतीची मते मिळाली. याचा अर्थ काँग्रेसची तीन मते फुटली, असा अर्थ घेतला जात आहे. मात्र, त्याहीपेक्षा अधिक मते फुटली असण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टी, एमआयएम यांचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. याशिवाय लहान पक्ष व अपक्षांपैकी एक-दोन मते काँग्रेसला वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून मिळाली असण्याची शक्यता गृहित धरता काँग्रेसची स्वत:ची पाच ते सात मते फुटली असण्याची शक्यता दिसते.
शिवसेनेने त्यांच्या दोन उमेदवारांना प्रत्येकी ३० मतांचा कोटा दिलेला होता; पण दोघांनाही प्रत्येकी २६ मते मिळाली. याचा अर्थ शिवसेनेची किमान आठ मते फुटली, असा अर्थ घेतला जात आहे. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर शिवसेनेचे स्वत:चे ५५ आमदार आहेत आणि ९ अपक्ष व लहान पक्षांच्या आमदारांचा त्यांना पाठिंबा होता आणि प्रत्यक्षात शिवसेनेला ५२ मते मिळाली. याचा अर्थ त्यांच्याकडील १३ मते त्यांना मिळाली नाहीत.
शिंदे समर्थकांची हुशारी
- एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, याची काळजी घेतली. या दोघांनाही ते पराभूत करू शकले असते; पण त्यांनी पक्षाशी प्रतारणा केली नाही. मात्र, शिल्लकची मते भाजपकडे वळवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला.
- शिवसेना काँग्रेसला चार मते देणार असल्याचे वृत्त आधी होते. ती खरेच दिली असतील तर काँग्रेसची आणखी मते फुटली, असा त्याचा अर्थ होतो. शिवसेनेने चार मते काँग्रेसला दिली नसतील तर मग त्यांची आठपेक्षा अधिक मते फुटली, असा अर्थ निघतो.