Vidhan Parishad Election Result : शिवसेनेनं मुंबईत 'अशी' मिळवली विधानपरिषदेची 'पदवी'; भाजपाला इंगा, राणेंना ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 12:18 PM2018-06-29T12:18:03+5:302018-06-29T12:20:59+5:30
विलास पोतनीस यांनी १९ हजार ३५४ मतं मिळवून दणदणीत विजयाची नोंद केली. प्रत्येक पाऊल जपून टाकत आणि संघटनेचा पुरेपूर वापर करत सेनेनं बाजी मारली.
मुंबईः महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपा हा 'मोठा भाऊ' असला, तरी राजधानी मुंबईत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम असल्याचं पुन्हा समोर आलंय. या 'नेटवर्क'च्या जोरावरच, विधानपरिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सेनेनं विजयी डरकाळी फोडली आहे आणि भाजपाला इंगा, तर नारायण राणेंना ठेंगा दाखवला आहे. शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपाचे उमेदवार अॅड. अमितकुमार मेहता आणि स्वाभिमान पक्ष पुरस्कृत राजू बंडगर यांचा पराभव करत विधानपरिषदेतील प्रवेश निश्चित केला आहे.
विलास पोतनीस यांनी १९ हजार ३५४ मतं मिळवून दणदणीत विजयाची नोंद केली. अमितकुमार मेहता यांना ७ हजार ७९२ मतांपर्यंतच मजल मारता आली, तर बंडगर गारदच झाले.
मुंबई पदवीधर मतदारसंघ हा तसं तर शिवसेनेचाच बालेकिल्ला. 'मातोश्री'शी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले डॉ. दीपक सावंत हे दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. परंतु, यंदा या मतदारसंघातील लढाई ही शिवसेनेसाठी 'स्वाभिमाना'ची झाली होती. कारण, 'परममित्र' भाजपाने या निवडणुकीत उमेदवार दिला होता आणि कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणेही समोर उभे ठाकले होते. त्यामुळे ही जागा शिवसेना राखणार का आणि कशी, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. पण, प्रत्येक पाऊल जपून टाकत आणि संघटनेचा पुरेपूर वापर करत सेनेनं बाजी मारली.
डॉ. दीपक सावंत यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी होती. त्यांना तिकीट दिलं, तर मतं फुटू शकतात, हे अचूक हेरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विलास पोतनीस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. स्थानीय लोकाधिकार समितीत सक्रिय असल्यानं पोतनीस यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे शिवसेनेची पहिली खेळी अचूक ठरली. त्यानंतर, पदवीधर मतदारांची नोंदणी हे तर शिवसैनिकांचं आवडतं काम. ते त्यांनी चोख पार पाडलं होतं. पण, त्यावर पाऊस पाणी फेरतो की काय, असं चित्र 25 जूनला - मतदानाच्या दिवशी निर्माण झालं होतं. धो-धो पाऊस कोसळत असल्यानं मतदारांना बाहेर काढणं कठीण झालं होतं. मात्र, सैनिक मागे हटले नाहीत. त्याचंच फळ शिवसेनेला मिळालं.
मुंबई पदवीधर मतदारसंघात 37 हजार 237 मतदारांनी मतदान केले होते. म्हणजेच, 52.81 टक्के पदवीधर मतदारांनीच आपला हक्क बजावला होता. विलास पोतनीस, अॅड मेहता, राजू बंडगर यांच्यासह १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही मतं कोणामध्ये कशी विभागली जातात, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, शिवसेनेनं मुंबईतील आपलं वर्चस्व कायम ठेवत सरशी केली आहे. त्यामुळे सैनिकांचा आत्मविश्वास वाढलाय आणि भाजपाला, राणेंना डिवचण्याची नामी संधी शिवसेना नेत्यांना मिळाली आहे.