Vidhan Parishad Election Result: फडणवीसांचा पुन्हा एकदा करिष्मा! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:32 AM2022-06-21T07:32:20+5:302022-06-21T07:54:00+5:30

Vidhan Parishad Election Result: संपूर्ण राज्याला प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाचवी जागा जिंकत महाविकास आघाडीवर मात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा राज्यसभेप्रमाणेच यावेळीही दिसला.

Vidhan Parishad Election Result: Charisma of Devendra Fadnavis once again! Maximum as Rajya Sabha in Legislative Council elections | Vidhan Parishad Election Result: फडणवीसांचा पुन्हा एकदा करिष्मा! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल

Vidhan Parishad Election Result: फडणवीसांचा पुन्हा एकदा करिष्मा! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल

googlenewsNext

 मुंबई : संपूर्ण राज्याला प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाचवी जागा जिंकत महाविकास आघाडीवर मात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा राज्यसभेप्रमाणेच यावेळीही दिसला. महाविकास आघाडीला पाच जागा मिळाल्या पण सहावी जागा गमवावी लागल्याने मोठा धक्का बसला आहे. दहाव्या जागेवर कोण जिंकणार भाजपचे प्रसाद लाड की काँग्रेसचे भाई जगताप अशी उत्कंठा असताना दोघेही जिंकले आणि काँग्रेसचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला.

दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात होते. कोणत्या एका उमेदवाराची विकेट जाणार याची राजकीय वर्तुळात गेले काही दिवस मोठी उत्सुकता होती.  या सामन्यात भाजपने बाजी मारली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिला. राज्यसभा निवडणुकीत मतांचे नियोजन आणि अपक्ष व लहान पक्षांची मते खेचून आणत फडणवीस यांनी तिसरा उमेदवार निवडून आणला होता. यावेळी या दोन्ही घटकांबरोबरच महाविकास आघाडीतील मते भाजपने फोडत फडणवीस यांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणली. दोन मते बाद ठरली. एकूण मतदान २८३ इतके होते.

बड्या नेत्यांनी केले मॅनेजमेंट
विधानभवनात दिवसभर उत्साह, तणाव अन् दावे- प्रतिदावे यांचा माहोल होता. मतांची जुळवाजुळव करण्याचे सगळ्यात मोठे आव्हान समोर असलेले भाजप व काँग्रेसचे नेते अधिक तणावात दिसत होते. मतदानाच्या नियोजनाची जबाबदारी चारही पक्षांच्या बड्या नेत्यांनी घेतली होती.   

भाजपला २० मते अधिक मिळाली
भाजपची स्वत:ची १०६ व सात अपक्ष अशी ११३ मते होती. राज्यसभा निवडणुकीत पहिल्या पसंतीची १२३ मते घेणाऱ्या भाजपने यावेळी पहिल्या पसंतीची १३३ मते घेत महाविकास आघाडीला चित केले. स्वत:कडील मतांपेक्षा भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल २० मते अधिक मिळाली. भाजपचे प्रवीण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय ३०, राम शिंदे ३०, उमा खापरे २७, प्रसाद लाड १७ अशी भाजपला पहिल्या पसंतीची मते मिळाली. प्रसाद लाड यांना १७ मते असली तरी दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपच्या अन्य चार उमेदवारांची ११ मते त्यांना मिळाली व २८ मते मिळवून ते विजयी झाले.

राष्ट्रवादीला मिळाली अधिकची मते
- राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांना पहिल्या पसंतीची २८ तर एकनाथ खडसे यांना २९ मते मिळाली. दोघांना मिळून पहिल्या पसंतीची ५७ मते मिळाली. राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ इतके होते आणि त्यांना लहान पक्ष व अपक्षांच्या सहा आमदारांचा पाठिंबा होता. 
- भाजपमधील मित्रांनी मला मत दिले, असा दावा राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी केला. घोडेबाजार करण्याची सवय असलेल्यांनी काहीतरी वेगळे केले असेल असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपने जिंकलेल्या पाचव्या जागेबाबत हाणला. 
- भाजपने पाचवी जागा जिंकली असली तरी महाविकास आघाडीचे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी दिली.

शिवसेना मते फुटली? आज बैठक
शिवसेनेचे सचिन अहीर यांना पहिल्या पसंतीची २६ तर आमशा पाडवी यांना २६ इतकी पहिल्या पसंतीची मते मिळाली. त्यांनी दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची प्रत्येकी ३० मते दिली होती अशी माहिती असून त्यामुळे शिवसेनेचीही मते फुटल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे ५५ आमदार असून सात अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा होता. शिवसेनेच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलावले असून मुख्यमंत्री ठाकरे दुपारी १२ वाजता बैठक घेणार आहेत.

देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाहीच
विविध आरोपांखाली अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व अनिल देशमुख यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. या मतदानासाठी तुरुंगातून तात्पुरती सुटका करावी, असे मलिक व अनिल देशमुख यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

काँग्रेसचा आक्षेप आयोगाने फेटाळला
भाजपचे पुणे जिल्ह्यातील दोन आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाच्या पद्धतीवर काँग्रेस पक्षाने घेतलेला आक्षेप आधी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला. 

पहिल्या पसंतीची जास्त मते असूनही हंडोरेंचा पराभव
काँग्रेसचे हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २२ तर दुसरे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मते मिळाली. काँग्रेसकडे स्वत:ची ४४ मते होती. तरीही दोघांना मिळून ४१ मते मिळाल्याने काँग्रेसची तीन मते फुटल्याचे समोर आले. पहिल्या पसंतीची जास्त मते असूनही चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. दुसऱ्या पसंतीची मते भाई जगताप यांना मिळाली.

Web Title: Vidhan Parishad Election Result: Charisma of Devendra Fadnavis once again! Maximum as Rajya Sabha in Legislative Council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.