मुंबई - राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत संख्याबळ नसताना भाजपाचा तिसरा उमेदवार निवडून आला. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभव सहन करावा लागला. आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून आमदारांना एकत्र ठेवले आहे.शिवसेनेने आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने २ उमेदवार उभे केले आहेत.
शिवसेनेकडील संख्याबळ पाहता त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे सगळे आमदार आणि समर्थक आमदार बैठकीला जमले आहेत. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत. अतिरिक्त मते कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आहे अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर आदित्य ठाकरे हेदेखील आमदारांशी संपर्क ठेवून आहेत.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवसेनेने सचिन आहिर, आमश्या पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नुकत्याच राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला आहे. त्यामुळे विधान परिषदेतही त्याची पुनरावृत्ती होईल का? याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिवसेनेत मतभेद नाहीत - राऊतदरम्यान अंतर्गत मतभेदाच्या वृत्तावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेत कधी अंतर्गत मतभेद होत नाहीत आणि होणार नाहीत. अशाप्रकारे जर कुणी अफवा पसरवत असेल तर त्यांना शिवसेनेचं अंतरंग कळलेलं नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. सर्व आमदारांना गोरेगावच्या वेस्ट इन हॉटेलमध्ये ठेवले आहे. तिथेच वर्धापन दिनाचा छोटेखानी कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करतील.