- मनोहर कुंभेजकरमुंबई : गेल्या शुक्रवारी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सूतोवाच केले होते. अजूनही दोन्ही पक्षांतील बंडखोरांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली नाही.पश्चिम उपनगरात शिवसेना व भाजपत बंडखोरी झाल्याने त्यांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यांना मनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धर्तीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.वर्सोवा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेना महिला विभागसंघटक व ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी बंड करून शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. वर्सोव्यातून भाजपाच्या दिव्या ढोले यांनी लव्हेकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करून बंडखोरी केली आहे.अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे माजी बंडखोर नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली. जातीच्या अवैध दाखल्यामुळे मुरजी पटेल व त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. मुरजी पटेल यांनी बंडखोरी मागे घ्यावी, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
Vidhan Sabha 2019: सेना-भाजपतील बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 1:28 AM