Vidhan sabha 2019 : विद्या ठाकुर यांना तारण्यात ‘भूमिहार’ समाजाचा वाटा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:00 AM2019-10-02T04:00:48+5:302019-10-02T04:01:41+5:30
विधानसभा निवडणुक-२०१९ साठी भाजपची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाली.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: विधानसभा निवडणुक-२०१९ साठी भाजपची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाली. या यादीमध्ये गोरेगाव विधानसभा क्षेत्रातुन विद्यमान आमदार विद्या ठाकुर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वतुर्ळात बरीच चर्चा सुरू झाली आहे. ठाकुर यांना तारण्यात ‘भूमिहार’ समाजाची महत्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे.
ठाकूर या बनारसमधील भूमिहार समाजातील आहेत. बनारस हे पंतप्रधान मोदी यांचे लोकसभा क्षेत्र आहे. या क्षेत्रात भूमिहार समाजाचे संख्याबळ अधिक आहे. त्याच संख्याबळाने ठाकुर यांना तारले, असे म्हटले जात आहे. या तिकिटासाठी ठाकुर यांनी गृहमंत्री अमित शाह यांचीही पाच नगरसेवक आणि दोन आमदारांसह भेट घेत तिकिटाची मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीचा ‘अडथळा’ पार
विद्या ठाकूर यांचे पती जयप्रकाश ठाकूर हे भारतीय जनता परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहे. मध्यंतरी राज्यभरातील उत्तर भारतीयांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने त्यांनी एका रथयात्रेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावे अशी ठाकूर यांची इच्छा होती. मुख्यमंत्री उद्घाटनाला आलेच नाहीत. विद्या ठाकूर यांनी राजकारणात २५ वर्षे पुर्ण केल्याच्या आनंदात एका कार्यक्रमाचे आयोजन करत त्याचेही आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले होते. या कार्यक्रमातही फडवणीस यांनी निव्वळ एक ध्वनी संदेश ठाकूर यांना पाठवला आणि ते स्वत: भाजपच्याच एका नेत्यासोबत कुंभयात्रेसाठी निघुन गेले. राज्यमंत्री असून देखील ठाकूर मुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमात उपस्थिती राखण्यात अपयशी ठरल्या होत्या. मुख्यमंत्र्यांची ही नाराजी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात अडचण ठरेल, अशी शक्यता होती. पण त्यातूनही ठाकूर तिकिट मिळवण्यात यशस्वी ठरल्या.