Vidhan Sabha 2019: भाजपने ‘त्या’ मित्रपक्षांना जागा दाखविली - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:10 AM2019-10-06T05:10:58+5:302019-10-06T05:15:02+5:30
युतीमध्ये शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या असून भाजप लहान मित्रपक्षांना १८ जागा देणार असे सुरुवातीपासून म्हटले जात होते.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना भाजपने जागा दाखविली असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हाणला. जागा दाखविली म्हणजे मित्रपक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी जागा दिल्या, अशी सारवासारवही ठाकरेंनी मिश्किलपणे केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
युतीमध्ये शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या असून भाजप लहान मित्रपक्षांना १८ जागा देणार असे सुरुवातीपासून म्हटले जात होते. प्रत्यक्षात १४ जागा दिल्या आणि त्यावरील सगळेच उमेदवार हे भाजपच्या कमळ चिन्हावर लढत आहेत. भाजपने लहान मित्रपक्षांना नावापुरत्या जागा दिल्याचे त्यावरून दिसते, अशी चर्चा होत असताना उद्धव यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ओबीसी व अन्य मागास प्रवर्गातील समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असून त्या निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर उद्धव पत्रकारांशी बोलत होते.
कार्यक्रमाला प्रकाश शेंडगे, हरीभाऊ राठोड, युनुस मणियार, बालाजी शिंदे, जे. डी. तांडेल, भाऊसाहेब बावणे, अरुण खारमाटे, भाऊसाहेब तोडणकर आदी यावेळी उपस्थित होते.
'म्हैसूर शाईच्या' ३ लाखांहून अधिक बाटल्यांचे वाटप
विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ‘म्हैसूर शाईच्या’ तीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे.
ही शाई बोटावर लावताच १५ सेकंदांमध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील ‘म्हैसूर पेंटस् अॅण्ड वॉर्निश लिमिटेड कंपनी’ मध्ये तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे. त्यामुळे या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखले जाते.