मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाआघाडीची घोषणा होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष आघाडीतून बाहेर पडलेला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. समाजवादी पक्ष 30-40 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये 38 जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र या जागावाटपात समाधानी नसल्याने समाजवादी पक्ष आघाडीतून बाहेर पडला असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी यांनी दिली आहे. तसेच याबाबत उद्या समाजवादी पक्षाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत नेमके राज्यात किती उमेदवार उभे करायचे यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्याचसोबत एमआयएमसोबत जाण्याबाबतची यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे अशातच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. बहुतांश जागांवर भाजपा, काँग्रेस, मनसे, शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. भाजपाने 125 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे तर काँग्रेसने 51 उमेदवार, मनसेने 27 उमेदवार आणि शिवसेनेने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे विधानसभेत रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे आघाडीच्या सुरुवातीलाच बिघाडी झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी होणार आहे.