Join us

Vidhan sabha 2019 : प्रकाश सुर्वे यांच्या उमेदवारीला दरेकरांचा बिनशर्त पाठिंबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 4:04 AM

उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी असताना मंगळवारी मागाठाणे मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मुंबई: उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी असताना मंगळवारी मागाठाणे मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याआधी पक्ष कार्यालय ते निवडणूक कार्यालयापर्यंत त्यांनी महायुतीच्या जयघोषात आपले शक्तिप्रदर्शन केले. एकीकडे महायुतीचा उमेदवार म्हणून प्रकाश सुर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला असला तरी विधानपरिषद आमदार आणि भाजप उमेदवार प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी दिसून आली़ दरेकर यांनी प्रकाश सुर्वे यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.प्रकाश सुर्वे यांनी निवडणूक कार्यालयात अर्ज सादर करतेवेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी,विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस,आमदार प्रवीण दरेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद शेलार आदी महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. प्रवीण दरेकर निवडणूक कार्यालयात जातेवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आणि गोंधळ घातला. जो निर्णय झाला त्यामुळे माझे काही कार्यकर्ते नाराज आहेत, असे असले तरी पक्षाचा निर्णय मान्य करून प्रचाराला जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य असून नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.प्रकाश सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना उपस्थित असलेले खासदार गोपाळ शेट्टी यांनी बहुमताने महायुतीच्या विजयाची खात्री दिली. महायुतीत कोणताही वाद नसून मतदारसंघातील सुजाण मतदार महायुतीच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे याना या संदर्भांत म्हणले की,अर्ज सादर करताना स्वत: गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर आणि असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित आहेत , त्यामुळे महायुतीत कोणतेही नाराजी नाट्य या ठिकाणी नाही. महायुतीचे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचाराला लागणार आहेत आणि मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी महायुतीचाच विजय होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मगथाणे