Join us

Vidhan sabha 2019 : मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांना समोरच्या दाराने आणण्याचा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 5:03 AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे वयाच्या साठाव्या वर्षी पहिल्यांदाच पुढच्या दाराने म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाग्य अजमावणार आहेत.

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे वयाच्या साठाव्या वर्षी पहिल्यांदाच पुढच्या दाराने म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाग्य अजमावणार आहेत. साठ वर्षीय पाटील हे सध्या पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.पाटील हे देवेंद्र फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री आहेत. एक व्यक्ती एक पद हा निकष बाजूला ठेवत त्यांना महसूल व बांधकाम मंत्री असूनही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षपद दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मराठा चेहऱ्यांची कमतरता कधीही नव्हती पण त्या मानाने भाजपकडे उल्लेखनीय असे मराठा चेहरे कमीच. फडणवीस मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर आदी मराठा चेहरे होते. तथापि, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने चर्चा व निर्णयांसाठी फडणवीस यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना पुढे केले गेले. त्या संबंधीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुखही पाटील हेच होते.प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटील यांच्याकडे राज्य भाजपची संघटनात्मक जबाबदारी असली तरी फडणवीस यांच्या टीममध्ये जे विभागीय शिलेदार आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. तेथील ५६ जागांपैकी जास्तीतजास्त युतीला मिळाव्यात यावर ते विशेष लक्ष केंद्रीत करतील. अशावेळी त्यांनी स्वत: विधानसभा लढविणे आवश्यक आहे, असे भाजप श्रेष्ठींचे मत होते. त्यानुसार त्यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. कोथरुड (पुणे) या भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाºया मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. पुणे शहर व जिल्ह्यात विधानसभेच्या तब्बल २१ जागा आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आता ढासळत असताना पाटील यांना पुण्यातून उभे करून तेथे मातब्बर नेता राष्ट्रवादीच्या विरोधात असावा हा हेतू भाजपने बाळगला असल्याचे दिसते.मुख्यमंत्र्यांनीच चंद्रकांत दादांकडे धरला आग्रहप्रदेशाध्यक्षपदाची तसेच पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने पाटील सुरुवातीला निवडणूक लढण्यास उत्सुक नव्हते पण त्यांनी लढावे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अतिशय आग्रही होते, असे समजते. रा.स्व.संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते भाजप असा प्रवास केलेले पाटील हे विधानसभेच्या आखाड्यात पहिल्यांदाच उतरत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019कोथरुडचंद्रकांत पाटीलभाजपा