Vidhan Sabha 2019: ‘जेवण नको, आता फक्त मत द्या’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 01:10 AM2019-10-07T01:10:36+5:302019-10-07T01:11:13+5:30
उमेदवारांनी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात केली.
वाजत-गाजत आणि शक्तिप्रदर्शन करीत काढलेल्या पदयात्रा, प्रचारफेऱ्यांमुळे भायखळा, वरळी, शिवडी मतदारसंघांमध्ये प्रथमच निवडणुकीचे वातावरण दिसून आले. निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नुकतीच झाल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांपुढे असणार आहे. येत्या आठवड्याभरात नेत्यांच्या जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा, रोड शो अशा कार्यक्रमांमुळे निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.
उमेदवारांनी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात केली. त्यांना घरोघरी जेवणासाठी आग्रह होत होता. निदान चहा तरी घेऊन जा, अशी आपुलकी दाखविली जात होते. ‘जेवण नको, आता फक्त मत द्या’, असे सांगतच त्यांना पुढचे घर गाठावे लागत होते. गल्लीबोळातून फिरणाºया व्हॅन, ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने उमेदवारांची देण्यात येत असलेली माहिती, उमेदवारांना निवडून देण्याचे करण्यात येत असलेले आवाहन, यामुळे राजकीय वातावरणातही रंग भरल्याचे दिसून आले. वरळी मतदार संघात सेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यातून प्रचाराला सुरुवात केली. सचिन अहिर, सुनील शिंदे या नेत्यांसह शिवाजीनगर, जनता वसाहत, आदर्श वसाहतींमधील मतदारांची भेट घेतली, तर आघाडीचे उमेदवार सुरेश माने यांनीही वरळीत पदयात्रा काढून प्रचाराला आरंभ केला. भायखळा विधानसभा मतदार संघात सेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी चिंचपोकळी भागातील चाळींमधील मतदारांना घरोघरी जाऊन भेट दिली. काँग्रेसच्या मधुकर चव्हाण यांनी मदनपुरा येथील भागात रॅली काढली, तर अभासेच्या गीता गवळी यांनी दगडीचाळीच्या देवीच्या प्रांगणात मतदारांची भेट घेतली. याखेरीज, वारिस पठाण यांनी नागपाडा परिसरातील उद्यानांत मतदारांच्या भेटी घेतल्या. शिवडी मतदार संघात सेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी प्रचार फेरी दरम्यान श्रद्धा सोसायटी, गिरनार टॉवर, आंबेवाडी, वाडिया बाग, मेघवाडी, गणेशगल्ली येथील जनतेची भेट घेऊन मतांसाठी साकडे घातले. त्याचप्रमाणे, मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांनीही रविवारचा मुहूर्त साधून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले, यावेळी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर उपस्थित होेते. काँग्रेसच्या उदय फणसेकर यांनी मतदारांची भेट घेतली.