Join us  

Vidhan Sabha 2019: मुंबईत अवैध मद्यपुरवठा करणाऱ्यांचा परवाना रद्द; कठोर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:26 AM

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ६ परवाने रद्द करण्यात आले, तर शहर जिल्ह्यातील ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणा-यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. अवैध मद्यविक्री व नियमभंग करणा-यांविरोधात अधिक कठोर कारवाई करण्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी दिला आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ६ परवाने रद्द करण्यात आले, तर शहर जिल्ह्यातील ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर व मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या आदेशान्वये शहर जिल्ह्याच्या अधीक्षिका स्नेहलता श्रीकर व उपनगर जिल्ह्याचे अधीक्षक सी. बी. रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मद्यविक्री करणाºया दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आॅनलाइन पद्धतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहीत वेळेत मद्यविक्री करणे, दुकान उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्यविक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांना निर्देश देण्यात आलेले असल्याची माहिती वर्मा यांनी दिली. नागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधात काही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. १८००८३३३३३३ व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक - ८४२२००११३३वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ३६ प्रकरणांमध्ये ४ लाख ८४ हजार ३१० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती उपनगर जिल्ह्याचे अधीक्षक सी. बी. रजपूत यांनी दिली.

टॅग्स :विधानसभा निवडणूक 2019