Vidhan sabha 2019 : शिवसेनेच्या उमेदवाराला चेंबूरमध्ये अंतर्गत विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:56 AM2019-10-02T03:56:29+5:302019-10-02T03:56:47+5:30
शिवसेनेकडून चेंबूर विधानसभेसाठी विद्यमान आमदार प्रकाश फातर्फेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याला शिवसेनेच्या पदाधिकार्यांनीच विरोध दर्शविला आहे.
मुंबई : शिवसेनेकडून चेंबूर विधानसभेसाठी विद्यमान आमदार प्रकाश फातर्फेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याला शिवसेनेच्या पदाधिकार्यांनीच विरोध दर्शविला आहे. याबाबतची तक्रार पदाधिका-यांनी निवेदनाव्दारे मातोश्रीवर केली आहे. या निवेदनावर शाखाप्रमुख,उपविभागप्रमुख ,विभागसंघटक यांच्या सह्या आहेत.
या निवेदनामध्ये म्हटले आहे कि, गेल्या पाच वर्षात फातर्फेकर यांनी कोणतीही जनहिताची कामे केली नाहीत. एसआरए प्रकल्पाचे अनेक लोक त्यांच्याकडे तक्रार घेऊन जातात पण ते लोकांऐवजी विकासकाच्या बाजूने भूमिका घेतात. माहुल येथील केमिकल कंपनीच्या प्रदूषणाचा नागरिकांना त्रास होतो़ याबाबत त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली़ परंतु त्याची दाखल घेण्यात आली नाही. विद्यार्थी गुरुगौरव ,विधानसभा मेळावे घेण्यात आली नाहीत. पाच वर्षात विधानसभेच्या पाच शाखेमध्ये एकही बैठक झाली नाही.
तसेच कार्यअहवालामध्ये ९५ पैकी ४५ पानात प्रत्यक्ष कामाचा उल्लेख नाही. केवळ छायाचित्रे आणि भेटीगाठींची आहेत. शेड, लादीकरण ,शौचालय आदी कामे अहवालात दाखविण्यात आली आहेत पण प्रत्यक्षात ५ ते १० टक्के ठिकाणीच कामे झाली आहेत . चेंबूरमधील महत्त्वाच्या समस्या सोडविण्याकडे फातर्फेकर यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही या निवेदनामध्ये म्हटले आहे.