मुंबई : मुलुंड विधानसभेमध्ये विद्यमान आमदाराला वयोमर्यादेचा नियम लावून, पक्षाकडून मिहिर कोटेचा यांना संधी मिळाली. या मतदार संघात इच्छुकांच्या यादीत नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्याही प्रचाराने जोर धरला होता. मराठी असल्याने उमेदवारी नाकारण्यात आल्याची नाराजी गंगाधरे आता व्यक्त करीत आहे. त्यामुळे या मतदार संघात मराठी गुजराती वाद रंगण्याची शक्यता आहे.पूर्वेला मराठी तर पश्चिमेला गुजराती वस्ती असलेल्या मुलुंडमध्ये गेल्या २० वर्षांपासून भाजपचे सरदार तारसिंह आमदार आहेत. मुलुंड विधानसभा हा भाजपसाठी सुरक्षित मतदार संघ म्हणून ओळखला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीतही तारासिंग यांच्या वयाच्या मुद्द्यावरून नवीन उमेदवाराला संधी देण्याचे ठरले होते. विनोद तावडे येथून लढणार अशीही चर्चा सुरू झाली आणि तारासिंग मातोश्रीवर धडकल्याने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला. ते तब्बल ६५ हजार इतक्या मताधिकक्याने विजयी झाले होते.यंदाही १५ हून अधिक जण भाजपकडून इच्छुकांच्या यादीत होते. त्यात, अखेरच्या क्षणाला गंगाधरे आणि कोटेचा यांचे नाव चर्चेत होते. ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगत गंगाधरेही कामाला लागले होते. मात्र, तारासिंग यांचा पत्ता कट झाल्यानंतर कोटेचा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने गंगाधरेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मराठी म्हणून डावल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली.
Vidhan sabha 2019 : मुलुंडमध्ये रंगतेय मराठी विरुद्ध गुजराती राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 3:42 AM