मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना अद्यापही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत उतरणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मनसेच्या विभाग अध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक आज सकाळी राजगड या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडत आहे. या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार मनसे विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठकही घेतली होती. यामध्ये निवडणूक लढवावी अथवा नाही यावर पक्षातील नेत्यांची मतं राज ठाकरेंनी जाणून घेतली. यावेळी जर मनसे निवडणूक लढणार नसेल तर इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते पक्षापासून दूरावण्याची शक्यता वर्तविली होती.
आज होणाऱ्या मनसे विभाग अध्यक्षांच्या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत. मनसे विधानसभेला किती जागा लढविणार? इच्छुक उमेदवारांच्या यादीची चाचपणी करण्याचं काम सुरु आहे. मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते मात्र राज ठाकरेंनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे या बैठकीनंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारात राज ठाकरे यांचा बोलबाला राहिल्याचे दिसून आले होते. अर्थात त्यांच्या ‘मनसे’चे उमेदवार रिंगणात नव्हते, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधाची भूमिका असली तरी, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मते द्या, असेही त्यांनी स्पष्ट सांगितलेले नव्हते; त्यामुळे प्रचारात गाजूनही मतांचा लाभ विरोधकांना होऊ शकला नव्हता. विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ फॅक्टर काही ठिकाणी महत्त्वाचा ठरण्याची अटकळ तेव्हापासूनच बांधण्यात येत आहे; पण काळ पुढे निघून चालला तरी त्याबाबतचा निर्णय या पक्षात होताना दिसत नाही. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही, परिणामी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची घालमेल वाढून गेली आहे.