Vidhan Sabha 2019: उमेदवारी अर्ज पडताळणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:20 AM2019-10-06T05:20:13+5:302019-10-06T05:21:17+5:30
कुर्ला विधानसभा भागात सर्व पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
मुंबई : कुर्ला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी आमदार मिलिंद कांबळे आणि ज्योत्स्ना जाधव यांच्यामध्ये चुरस होती. दोन्ही उमेदवारांनी पक्षाचा ए-बी फॉर्म भरला होता. यापैकी एका उमेदवाराला माघार घ्यायला लावून हा तिढा सोडविण्याचा पर्याय होता. परंतु अर्ज पडताळणीत एक अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे.
कुर्ला विधानसभा भागात सर्व पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेसने यादी जाहीर केली नव्हती. उमेदवारीसाठी पक्षाकडून आधीपासून कांबळे आणि जाधव ही नावे चर्चेत होती. निवडणूक जाहीर होण्याआधीपासून दोघांनीही तयारी सुरू केली होती. जाधव यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी बॅनर लावले होते. तर मिलिंद कांबळे यांनीही २०१४ च्या पराभवानंतरही भेटीगाठी सुरूच ठेवल्या होत्या. परंतु कांबळे यांचे राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्याशी मतभेद होते़ त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे अशी चर्चा होती. तर ज्योत्स्ना जाधव यांना मलिक यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून या घडामोडींना वेग आला होता. दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास एक बंडखोरी करेल अशी शक्यता लक्षात घेऊन पक्षानेही तिसऱ्या पर्यायाचा विचार सुरू केला होता. यामध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचेही नाव होते. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा कांबळे आणि जाधव यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा अर्ज भरेपर्यंतही पाहायला मिळाली. दोघांनीही अर्ज भरल्यामुळे माघार कोण घेणार याबाबत चर्चा सुरू होती. दोघेही उमेदवार माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते़ परंतु पक्षाकडून दोघांमध्ये समेट घडविला जाईल, असे एका नेत्याने सांगितले होते. आता मिलिंद कांबळे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. यासोबत विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे मंगेश कुडाळकर, मनसेचे आप्पा अवसरे, बसपचे नितीन भोसले, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे गणेश शिंदे, एमआयएमचे रत्नाकर डावरे आणि अपक्ष ऐश्वर्या कवळकर यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे.