- विशेष प्रतिनिधीमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नाही. बावनकुळेंना कामठीऐवजी काटोलमधून संधी दिली जाऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण-पश्चिम ) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (कोथरूड; पुणे) यांच्यासह २० विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांचा समावेश असून, ११ आमदारांचा पत्ता कटला आहे.विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, राम शिंदे, डॉ.संजय कुटे, अशोक उइके, डॉ.अनिल बोंडे, सुरेश खाडे, आशिष शेलार, मदन येरावार, विजय देशमुख, अतुल सावे, योगेश सागर, विद्या ठाकूर या २० विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमदेवारी देण्यात आली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.मुख्यमंत्र्यांचे पीए रिंगणातमुख्यमंत्री फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार यांना लातूर जिल्ह्यातील औसामध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे काँग्रेसने या आधीच विद्यमान आमदार बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पीएस विद्याधर महाले यांच्या पत्नी श्वेता यांना चिखलीतून संधी देण्यात आली. त्या जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत.शहादा (जि.नंदुरबार) येथून उमेदवारी मिळालेले राजेश पाडवी हे अंधेरी; मुंबई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक होते. त्यांनी कालच पदाचा राजीनामा दिला. आज त्यांना उमेदवारी मिळाली.कथित वादग्रस्त सीडीमुळे चर्चेत आलेले संजय पुराम यांना आमगावमधून उमेदवारी मिळाली. मात्र, दोन पत्नींच्या भांडणात चर्चेत आलेले राजू तोडसाम (आर्णी) यांना उमेदवारी नाकारण्यात आली.माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत यांना विक्रमगडमधून (जि.पालघर) उमेदवारी मिळाली.बाहेरून आलेल्यांना संधीअन्य पक्षांमधून आलेल्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संदीप गणेश नाईक, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मदन भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, राष्ट्रवादीतून आलेले गणेश नाईक यांच्याऐवजी भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने नाईकांना धक्का दिला.या आमदारांचा कापला पत्ताउदेसिंह पाडवी - शहादा, सुधाकर कोहळे - दक्षिण नागपूर, राजू तोडसाम आर्णी, मेधा कुलकर्णी - कोथरूड, दिलीप कांबळे - पुणे कँटोन्मेंट, विजय काळे - शिवाजीनगर, आर.टी.देशमुख - माजलगाव, सरदार तारासिंह - मुलुंड आणि नरेंद्र पवार- कल्याण पश्चिम, विष्णू सावरा - विक्रमगड या ११ आमदारांचा पत्ता कटला आहे. या पैकी उदेसिंह पाडवी आणि विष्णू सावरा यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली.
Vidhan sabha 2019 : खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही; नाईकांचा पत्ता कट, भाजपचे १२५ उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 7:06 AM