Vidhan sabha 2019 : मुंबईत आवाज शिवसेनेचाच, ३६ पैकी १९ शिवसेना तर १७ भाजपच्या वाट्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:44 AM2019-10-02T06:44:24+5:302019-10-02T06:44:34+5:30

राज्यातील जागावाटपात भाजप मोठा भाऊ ठरला असला, तरी मुंबईत मात्र शिवसेनेने बाजी मारली आहे. युतीच्या जागावाटपात मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक १९ जागा शिवसेसेनेकडे आल्या आहेत

Vidhan sabha 2019: Shiv Sena is Big Brother in Mumbai | Vidhan sabha 2019 : मुंबईत आवाज शिवसेनेचाच, ३६ पैकी १९ शिवसेना तर १७ भाजपच्या वाट्याला

Vidhan sabha 2019 : मुंबईत आवाज शिवसेनेचाच, ३६ पैकी १९ शिवसेना तर १७ भाजपच्या वाट्याला

Next

- गौरीशंकर घाळे
मुंबई : राज्यातील जागावाटपात भाजप मोठा भाऊ ठरला असला, तरी मुंबईत मात्र शिवसेनेने बाजी मारली आहे. युतीच्या जागावाटपात मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक १९ जागा शिवसेसेनेकडे आल्या आहेत, तर भाजपकडे १७ जागा असणार आहेत. मुंबईच्या राजकारणात आवाज कुणाचा म्हणत युतीच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले, आव्हाने-प्रतिआव्हाने दिली. जागावाटपात तूर्तास याचा निकाल लागला असून, शिवसेनेचाच आवाज वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील जागावाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाले आहे. मागील निवडणुकीत भाजपने मुंबईत १५ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने १४ ठिकाणी विजय नोंदविला होता. या २९ जागांवर सध्या ज्या पक्षाचा आमदार आहे, त्याच पक्षाकडे ती जागा देण्याचे धोरण दोन्ही पक्षांनी स्वीकारले. २०१४ पूर्वीचा इतिहास बाजूला ठेवून या २९ जागांचा निर्णय झाला. त्यामुळे गोरेगावसारखा मतदारसंघ भाजपकडे कायम राहिला. मागील निवडणूक राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा येथे पराभव केला होता. नव्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा आता भाजपकडेच राहणार आहे.

सरदार तारासिंग यांना डच्चू
भाजपने पहिल्या यादीत मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग यांना डच्चू दिला आहे. त्यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. कोटेचा यांनी मागील निवडणूक वडाळा येथून लढविली होती. त्यावेळी अवघ्या पाचशे मतांनी त्यांचा पराभव झाला होता. कोटेचा यांना मुलुंडमधून संधी देत, त्यांचे एकप्र्रकारे पुनर्वसनच करण्यात आले आहे.
वडाळ्याची जागा भाजपकडे
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश केला. या जागेवरून युतीत रस्सीखेच होती. ही जागा भाजपकडे आल्याने कोळंबकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पहिल्या यादीतील भाजप उमेदवार
मनिषा चौधरी(दहिसर),
मिहिर कोटेचा(मुलुंड ), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व ),
योगेश सागर (चारकोप), विद्या ठाकूर (गोरेगाव), अमित साटम
(अंधेरी पश्चिम), पराग अळवणी (विलेपार्ले), राम कदम (घाटकोपर पश्चिम), आशिष शेलार (वांद्रे
पश्चिम), तमिळ सेल्वन (सायन कोळीवाडा), कालिदास कोळंबकर (वडाळा), मंगलप्रभात लोढा (मलबार हिल).

पहिल्या यादीतील शिवसेना उमेदवार
प्रकाश सुर्वे (मागाठाणे), सुनील राऊत (विक्रोळी), भांडुप पश्चिम, रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व), सुनील प्रभू (दिंडोशी), रमेश लटके (अंधेरी पूर्व), चांदिवली, विठ्ठल लोकरे (मानखुर्द शिवाजीनगर), तुकाराम काते (अणुशक्तीनगर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), मंगेश कुडाळकर (कुर्ला), संजय पोतनीस (कलीना), वांद्रे पूर्व, धारावी, सदा सरवणकर (माहिम), आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), यामिनी जाधव (भायखळा), पांडुरंग सकपाळ (मुंबादेवी).

येथील उमेदवारांची घोषणा बाकी :
भाजप : बोरीवली, मालाड (पश्चिम), वर्सोवा, घाटकोपर पूर्व, कुलाबा.
शिवसेना : भांडुप पश्चिम, चांदिवली, वांद्रे पूर्व, धारावी.

तावडेंना पहिल्या यादीत स्थान नाही
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे (बोरीवली), माजी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता (घाटकोपर पूर्व), आमदार राज पुरोहित (कुलाबा), आमदार भारती लव्हेकर (वर्सोवा) या चार विद्यमान आमदारांना भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. या चार मतदारसंघांसह मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केला नाही. मालाड येथील काँग्रेस आमदार अस्लम शेख शिवसेना किंवा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. भाजपमधील त्यांच्या प्रवेशाला स्थानिक नेत्यांकडून विरोध होत आहे.

Web Title: Vidhan sabha 2019: Shiv Sena is Big Brother in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.