नवी दिल्ली - घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसने महाराष्ट्रातील ५१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या अनेक दिग्गजांनी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या यादीत नेमकी कोणाची नावं असणार याचीच चर्चा सुरु होती.
आज जाहीर केलेल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या यादीत कोणताही मोठा बदल दिसत नाही. मुंबादेवीमधून विद्यमान आमदार अमीन पटेल, पलूस-कडेगावमधून डॉ. विश्वजीत कदम, अक्कलकुवामधून के. सी पाडवी, शहादामधून पद्माकर वळवी, चांदिवली - नसीम खान, धारावी - वर्षा गायकवाड, भोर - संग्राम थोपटे, संगमनेर - बाळासाहेब थोरात, लातूर - अमित देशमुख, सोलापूर शहर - प्रणिती शिंदे, बुलढाण्यातून हर्षवर्धन सपकाळ, रिसोडमधून अमित झनक, धामनगाव येथून वीरेंद्र जगताप, तेवसामधून यशोमती ठाकूर, आर्वीमधून अमर काळे, सावनेरमधून सुनील केदार, ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर भोकर येथून अशोक चव्हाण, वरोरामधून खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत बरेचसे विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तिकीट न दिल्यास नाराजी आणि आउटगोइंगची भीती असल्याने सुरुवातीला ५१ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत काही आश्चर्यकारक बदल पाहायला मिळणार का याबाबत उत्सुकता कायम आहे.