Vidhan Sabha 2019: कार्यकर्त्यांशी चर्चा, मतदारांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 01:08 AM2019-10-07T01:08:37+5:302019-10-07T01:08:41+5:30
वांद्रे पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जीशान सिद्दीकी यांनी पदयात्रा काढून व बैठक घेऊन मतदारांशी संपर्क साधला.
प्रचारासाठी आजचा रविवार व पुढील रविवार हे दोन रविवार मिळत असल्याने, उमेदवारांनी रविवारी जाहीर सभा टाळून मतदारांना वैयक्तिकरीत्या, सोसायटीमध्ये जाऊन भेटण्यावर भर दिला.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जीशान सिद्दीकी यांनी पदयात्रा काढून व बैठक घेऊन मतदारांशी संपर्क साधला. यावेळी माजी मंत्री बाबा सिद्दीकी, माजी खासदार प्रिया दत्त उपस्थित होत्या. शिवसेनेचे उमेदवार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाचे आवाहन केले. एमआयएमचे सलीम कुरैशी यांनी मंगळवारपासून प्रचार करण्याचे नियोजन केले असून, रविवारी कार्यालयात बसून कार्यकर्त्यांशी प्रचाराबाबत चर्चा केली व नागरिकांशी संवाद साधला.
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांनी सांताक्रुझ येथे पदयात्रेमध्ये सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला व सायंकाळी वांद्रे येथे विजयादशमीच्या संचलनात सहभागी झाले.
काँग्रेसचे उमेदवार आसिफ झकेरिया यांनी त्यांच्या पिंपळेश्वर वाडी परिसरात पदयात्रा काढून मतदारांना संबोधित केले. वंचित बहुजन आघाडीचे इश्तिहाक जहागीरदार यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधण्यावर भर दिला.
धारावी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आशिष मोरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला व विविध चाळींमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला.
काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी विविध ठिकाणी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. एमआयएमचे उमेदवार मनोज संसारे यांनी मतदारसंघातील विभागांमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला व घरोघरी भेटी देण्यावर भर दिला.