मुंबई - मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक्सिस बँकेला मदत केल्याचा आरोप लावला जातो. मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस या एक्सिस बँकेत कामाला आहेत. त्यामुळे पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून काढून एक्सिस बँकेत उघडण्यात आली असा आरोप विरोधक करतात. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून एक्सिस बँकेत बदलली. मात्र हा निर्णय एक्सिस बँकेत पोलिसांचे खाते बदलण्याचं काम मार्च 2005 मध्ये झाले. अमृतासोबत माझं लग्न नोव्हेंबर 2005 मध्ये झालं. मला स्वप्न पडलं नव्हतं मी 2019 मध्ये मुख्यमंत्री होईन असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच विरोधकांनी माझ्यावरील एकही आरोप सिद्ध केले तर मी राजकारणात सन्यास घेईन अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं आहे.
दरम्यान, गेल्या 4 वर्षात कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप युतीच्या सरकारवर झाले नाहीत. विरोधकांनी भाषणात घोटाळ्याचे आरोप केले, विरोधकांनी एकाही आरोपाचे पुरावे दिले नाहीत. हवेत आरोप करतात, पुरावे द्यावेत, 15 वर्ष आम्ही विरोधात होतो एकही आरोप पुराव्याशिवाय लावला नाही. हायकोर्टातही आरोप सिद्ध झाले नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
तसेच आघाडी शासन असताना आम्ही पुरावे देऊन आरोप केले, त्याची साधी चौकशीही या लोकांनी केली नाही. मात्र यांनी जे पुराव्याशिवाय आरोप केले त्यांची चौकशी आम्ही केली. त्यामुळे विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आरेमध्ये विरोध करणारे कोण?आरे ही सरकारची खाजगी जागा आहे, ते जंगल नाही. हायकोर्टानेही सरकारच्या बाजूने कौल दिलं. आरे वसाहतीचा जंगलांशी संबंध नाही असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. आम्ही 23 हजार झाडे लावली अजून 12 हजार झाडे लावणार आहोत. मेट्रोसाठी 2 हजार झाडे कापली जातात. प्रकल्प करताना पर्यावरणाचा विचार केला जातो. जी झाडे कापणार ती मोठी झाडे नाहीत. मुंबईत खाजगी जागेत आम्ही इमारती उभ्या केल्या, प्रत्येक विकासासाठी झाडे कापली गेली. जे पर्यावरणासाठी काम करतात त्यांचा आदर आहे. मात्र यामध्ये 10 आक्षेप बंगळुरुवरुन कसे आले? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
मुंबई विकासाच्या प्रगतीपथावर आहे. मुंबईतील भौगोलिक स्थिती पाहिली तर समुद्रात येणारी हायटाइड आणि कोसळणारा पाऊस यामुळे पाणी साचण्याचे प्रकार होतात. सध्या 5 पंपिंग स्टेशन होते मुंबईला 8 पंपिंग स्टेशनची गरज आहे. साचलेले पाणी बाहेर फेकण्यासाठी याची गरज आहे. 3 पंपिंग स्टेशन झाल्यास मुंबई पाण्यात तुंबणार नाही. मुंबईत 340 किमी मेट्रोचं जाळं पसरविण्याचं काम सुरु आहे. सध्या रेल्वेने 70 लाख लोक प्रवास करतात, मेट्रो तयार झाल्यास 1 कोटी लोकं प्रवास करतील. त्यामुळे मुंबईत कधीच थांबणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.