मुंबई: राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करू असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अधिवेशनात देखील विरोधकांनी एमपीएससीवरुन प्रश्न उपस्थित करत सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला. Vidhan Sabha Adhiveshan: All MPSC vacancies will be filled by July 31, 2021;Deputy CM Ajit Pawar's big announcement
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ प्रयंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.
MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर असं या २४ वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेल्याने त्यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वप्निलचा संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. 'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका' असे स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. त्याने २०२०मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे.