मुंबई: आजपासून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करू असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळानं आक्षेप व्यक्त केला.
अधिवेशनात केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, असा ठराव सरकारकडून मांडण्यात आला. केंद्र सरकारकडून डेटा मिळावा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून हा डेटा हवा आहे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठरावातील त्रुटी दाखवत सरकारवर टीका केली. छगन भुजबळ यांनी अर्धसत्य सांगितलं आहे. कोर्टाने काय म्हटलं हे समजून घ्या. कोर्टाने सेन्सस डेटा बद्दल भाष्य केलं नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला आहे. यानंतर ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजपा आमदार आक्रमक झाले. भाजपा आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. भाजपाकडून ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली.
तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की ,शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष मारेती आप्पा या आमदारांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. मात्र तालिका अध्यक्षांच्या दालनात कोणतीही धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.