मुंबईः शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातील कुणीही आतापर्यंत निवडणूक रिंगणात उतरलं नव्हतं. महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना आणि नसतानाही महाराष्ट्राचा 'रिमोट कंट्रोल' बाळासाहेबांकडे होता, पण त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही प्रत्यक्ष निवडणूक लढवली नव्हती. मात्र, आता बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनी या परंपरेला छेद दिला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आपण स्वतः निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. या घोषणेनं शिवसैनिकांना नवं बळ मिळालं आहेच, पण पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात एक वेगळाच जोश पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपाला चिमटे काढले. त्यातही ते महाराष्ट्रात किंवा भारतापुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर थेट अमेरिकेत टेक्सासला जाऊन पोहोचले.
आदित्य ठाकरे नावाचं 'सूर्ययान' मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुखरूप उतरेल, मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त करत संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला. बाळासाहेब होते तेव्हा आणि नंतरही महाराष्ट्राचं राजकारण शिवसेनेच्या मुठीत आहे आणि ते पुढे नेण्याचं काम आदित्य ठाकरे करतील, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. आदित्य हे आज देशाचे नेते झाले आहेत. महाराष्ट्रातील ही ठिणगी देशात वणवा पेटवेल, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.
त्यानंतर, आदित्य यांचा गौरव करताना, देशाची सीमा ओलांडत संजय राऊत थेट अमेरिकेत पोहोचले. काही दिवसांपूर्वी टेक्सासमध्ये 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम झाला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अब की बार, ट्रम्प सरकार', असा नारा देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार केला होता. तो धागा पकडत संजय राऊत म्हणाले की, 'आजचा हा सगळा माहोल पाहून मला असं वाटलं की भविष्यात मिस्टर ट्रम्प आपल्याला प्रचारासाठी टेक्सासला बोलावतील आणि आम्हीसुद्धा घोषणा देऊ 'हाउडी अॅडी'.'
दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा बरेच दिवस राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावर आज स्वतः आदित्य यांनीच शिक्कामोर्तब केलं.