परिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक; ३ भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाला प्रत्येकी १
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 05:45 IST2025-03-04T05:44:19+5:302025-03-04T05:45:09+5:30
भाजपला सर्वांत कमी कार्यकाळ, विरोधकांना संधी का नाही?

परिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक; ३ भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाला प्रत्येकी १
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेत महायुतीचे प्रचंड बहुमत लक्षात घेता पाचही जागा त्यांनाच मिळतील असे चित्र आहे.
पाच सदस्य नोव्हेंबरची विधानसभा निवडणूक लढले व विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या. त्यात भाजपचे प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर, शिंदेसेनेचे आमश्या पाडवी तर अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांचा समावेश आहे. दटके मध्य नागपूरमधून, कराड लातूर ग्रामीणमधून, पडळकर जतमधून, आमश्या पाडवी अक्कलकुवामधून तर राजेश विटेकर पाथरीतून विधानसभेवर निवडून गेले होते.
या पाच जणांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ज्या दिवशी संपणार होता त्या दिवसापर्यंतच त्यांच्या जागी निवडून येणाऱ्या आमदारांचा कार्यकाळ असेल.
भाजपला कमी कार्यकाळ
अजित पवार गटाकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्यांचा कार्यकाळ हा सव्वापाच वर्षांचा असेल. शिंदेसेनेकडून संधी मिळेल त्यांचा कार्यकाळ हा सव्वातीन वर्षांचा असेल. भाजपकडून ज्यांना आमदारकी मिळेल त्यांचा कार्यकाळ हा १३ महिन्यांचाच असेल. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्या फळीतील एक-दोन जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
विरोधकांना संधी का नाही?
निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जी अधिसूचना जारी केली आहे तीत पाच जागांची एकाच दिवशी पण वेगवेगळी निवडणूक घ्यावी असे म्हटले आहे. याचा अर्थ प्रत्येक जागेसाठीचा जिंकण्यासाठीचा कोटा हा वेगवेगळा असेल. त्यामुळे विरोधकांना जिंकण्याची संधी नाही. ज्यांचा कार्यकाळ एकाचवेळी संपतो अशा ३ जागांची एकत्र निवडणूक व अन्य २ जागांची वेगवेगळी होत असते, तसे झाले तरीही जिंकण्यासाठीचा कोटा विरोधकांकडे नसेल.