Join us  

Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:59 AM

Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, मुंबईतील ३६ पैकी ६ जागांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Maha Vikas Aghad Vidhan Sabha election : विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने महाविकास आघाडीने जागावाटपाचा मुद्दा निकाली काढण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सलग तीन दिवस होणार आहेत. राज्यातील विभागनिहाय जागावाटपावर चर्चा करण्यापूर्वी मुंबईतील ३६ जागांबद्दल चर्चा झाली. यात ६ जागांवरून पेच निर्माण झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत आधी जागावाटप करून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा दिसत आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये असलेल्या सोफिटेल हॉटेलमध्ये मविआची बैठक झाली. 

ठाकरेंबरोबर काँग्रेसचेही मुंबईतील जागांवर लक्ष

महाविकास आघाडीने सर्वात आधी मुंबईतील ३६ जागांवाटपावर चर्चा सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसची कामगिरीही चांगली राहिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ६ पैकी चार जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या, तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. दोन पैकी एक जागा काँग्रेसने जिंकली होती. तर ठाकरेंच्या शिवसेनेने तीन जागा जिंकल्या होत्या. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा असे मतदारसंघ आहेत, ज्यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच काँग्रेसनेही दावा केला आहे. 

मुंबईत कुणाला किती जागा हव्या?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ३६ पैकी २० जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. तर १८ जागांवर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर मागितल्या आहेत. शिवसेना (ठाकरे)-काँग्रेसनेच मुंबईतील सर्वाधिक जागांवर दावा केला असून, यातील ६ मतदारसंघांवर दोन्ही पक्षांनी दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. 

मुंबईतील 'ते' सहा मतदारसंघ कोणते?

आणखी एक माहिती अशी की, मुंबई उपनगरातील कुर्ला, वर्सोवा आणि घोटकोपर पश्चिम या तीन मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. ज्या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने दावा केला आहे, त्यात भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, माहिम यांचा समावेश आहे. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य, कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद आहे आणि कोणाचा उमेदवार निवडून येऊ शकतो या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे समजते. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४महाविकास आघाडीउद्धव ठाकरेशरद पवारकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस