विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्प मांडला. आज सकाळी सुरुवातीपासून राज्यातील विविध विषयांवरुन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पवईमधील अतिक्रमणावरील कारवाईवरुन आक्रमक झाले. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक
काही दिवसापूर्वी मुंबईतील पवईमध्ये अतिक्रमण काढल्याचे समोर आले होते, दरम्यान, आझ विधिमंडळात याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
"पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावायचा नाही, पावसाळ्यात कोण अतिक्रमण काढतं का? सहाशे कुटुंबांना तुम्ही बॅरिकेट्स करुन काढलं. १४ वर्षाच्या मुलाला मारलं. आता ती लोक पावसात रस्त्यावर झोपली आहेत. हा बुलडोझर कोणाचा आहे? स्वत:ला बुलडोझर बाबा म्हणवत आहात, असा टोलाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला या संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
"बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का ? पवई येथील जयभिम नगरच्या रहिवाशांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी दाखल करा. मुंबईतील पवई येथील जयभीम नगरच्या रहिवाशांवर अतिक्रमण हटविताना केलेल्या अन्यायाला आज सभागृहात वाचा फोडली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी, महानगर पालिकेतील संबंधित अधिकारी यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली. त्याचबरोबर या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देण्याची मागणी आज विधानसभेत केली. पावसाळ्यात अतिक्रमण काढताचं कसे, जयभीम नगरमध्ये ६०० कुटुंब राहतात. सरकारला त्यांच्या जीवाची पर्वा आहे की नाही? पोलिस ताफा वापरून मागासवर्गीय अन्याय केला गेला. गर्भवती स्त्रियांना मारले. १४ वर्षाच्या मुलाला मारले. स्वत:ला बुलडोझर बाबा म्हणता आणि गरीबावर बुलडोजर चालवता ही हुकुमशाही आहे", असं असं ट्विटही विजय वडेट्टीवार यांनी केले.