Join us

नुरा कुस्त्या सुरू झाल्या... खऱ्या कुस्त्या बाकी!

By अतुल कुलकर्णी | Published: May 29, 2023 9:08 AM

धनुष्यबाण चिन्ह जरी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले असले, तरी विधानसभा अध्यक्षांना अद्याप निर्णय घ्यायचा आहे. 

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

कली मूठ सव्वा लाखाची असते..!, अशी एक म्हण आहे. जोपर्यंत ती बंद असते, तोपर्यंत त्यावरून वाटेल ते दावे करता येतात. एकदा का मूठ उघडली की, अनेक गोष्टी उघड्या पडतात. महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटांची शिवसेना यांच्यातही झाकली मूठ आधी कोण उघडणार, एवढाच काय तो प्रश्न आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ असो की, भाजप- शिंदे शिवसेनेची झाकली मूठ असो... मूठ हळूहळू मोकळी व्हायला सुरुवात झाली आहे, हे खरे. 

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ यावरून वाद सुरू असताना, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही तिळे भाऊ आहोत, असे सांगून एक नवाच विनोद केला आहे. प्रत्यक्षात लोकसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा या तिळ्या भावांची तोंडे तीन दिशेला जाऊ नयेत, म्हणजे मिळवली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर यांनी भाजपमध्ये आपल्याला सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशाच पद्धतीचे आरोप भाजप- शिवसेना एकत्रित सरकारमध्ये असताना शिवसेनेचे अनेक मंत्री करत होते.

आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा खिशात ठेवून फिरत आहोत, असेही सांगत होते. मात्र, त्यावेळी कोणीही तो राजीनामा दिला नव्हता. तेव्हाची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आता एकनाथ शिंदे गटाला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभेच्या २२ जागांची मागणी केली आहे. मागच्या लोकसभेत भाजपने २३ जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. १८ पैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहेत. त्यामुळे शिंदे गटाला १३ ते १४ जागा द्यायच्या आणि उरलेल्या सगळ्या जागा भाजपने लढवायच्या, अशी भाजपची रणनीती आहे.

धनुष्यबाण चिन्ह जरी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले असले, तरी विधानसभा अध्यक्षांना अद्याप निर्णय घ्यायचा आहे. त्या निर्णयानंतर प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाईल. मुंबई महानगरपालिकेत शिंदे गटाकडे आणि ठाण्यामध्ये भाजपकडे किती इच्छुकांचा ओढा असेल, हा कळीचा प्रश्न आहे. मुंबईत भाजपने आतापासून मजबूत फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपची जबरदस्त कोंडी झाली आहे. त्यामुळे तिथे प्रत्येकाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे वाटत आहे. मुळात महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. त्याआधी जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर आश्चर्य नाही. म्हणूनच शिंदे गटाने लोकसभेसाठी फिफ्टी-फिफ्टी जागांचा निकष ठेवला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात देखील भाजपचे संख्याबळ  शिंदे गटाच्या दुप्पट असताना मंत्रिमंडळाचे वाटप मात्र, फिफ्टी-फिफ्टी झाले आहे.

आता विस्ताराची चर्चा सुरू आहे. विस्तारातही फिफ्टी-फिफ्टी झाले, तर तोच निकष लोकसभेला लावला जाईल, अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटते. २३ खासदार निवडून आलेले असताना २२ जागा कशा घ्यायच्या? शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा राजकीय लाभ आता घ्यायचा नाही तर कधी घ्यायचा? असे प्रश्न उपस्थित करत काहीही करून महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्तीतजास्त जागा लढण्याची आखणी भाजपने सुरू केली आहे. आपण किती जागा जिंकतो, त्यापेक्षा आपले संघटन राज्यभर पसरले जाते, ते जास्त महत्त्वाचे, हे भाजपचे त्यामागचे गणित आहे. 

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाला लोकसभेच्या २२ जागा मिळणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. मात्र राजकारणात सतत आपला मुद्दा चर्चेत ठेवला की, त्यातून एक परसेप्शन तयार होते. त्याचा सोईनुसार राजकीय फायदा घेता येतो. म्हणून अशी विधाने येत्या काळात वाढत जातील. ज्यावेळी २२ जागांची मागणी शिंदे गटाकडून झाली, त्यावर भाजपच्या सर्व नेत्यांनी एका सुरात अतिशय धोरणी आणि संयमित प्रतिक्रिया दिली. भाजपचा हा धोरणीपणा आणि त्या मागचा राजकीय डाव इतक्या पटकन लक्षात येणे अशक्य आहे. लोकसभेच्या वेळी भाजपची महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांसोबत खुलेपणाने तर शिंदे गटातील काही जागांच्या बाबतीत पडद्याआड लढाई रंगलेली पाहायला मिळेल. 

कोणी किती जागा लढवायच्या, हा वाद महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांतील नेते यावरून जी काही भाषणबाजी करत आहेत, ती महाराष्ट्र पाहत आहे. नेमका असाच प्रश्न भाजप आणि शिंदे गटात निर्माण होत असताना, भाजपने हा विषय ज्या पद्धतीने हाताळला त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही धडे घेण्याची गरज आहे. सत्तेत असलेल्या शिंदे गटाला आज दुखावण्याची भाजपची इच्छा नाही. मात्र, या गटासोबत आपल्याला निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, याची शंभर टक्के खात्रीदेखील भाजपला नाही. भाजपचे नेते ही गोष्ट सातत्याने बोलून दाखवत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर कोणी, किती जागा लढवायच्या, याच्या फ्री स्टाईल नुरा कुस्त्या येत्या काही महिन्यात वाढतील. लोक त्याचा आनंद घेतील. मात्र, ज्यावेळी प्रत्यक्ष जागा वाटपाची वेळ येईल, तेव्हा खऱ्या कुस्त्या सुरू होतील. त्यावेळी कोण लहान, कोण मोठा भाऊ हे कळेल. त्यावेळी हेच सर्वपक्षीय नेते, ‘तेरी दोस्ती मेरा प्यार...’, हे गाणे गाताना दिसतील, की ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा...’, असे गाणे गाताना दिसतील...? तुम्हाला काय वाटते...?

टॅग्स :महाराष्ट्रराजकारणशिवसेना