Join us

राजकीय फटाके फुटायला वेळ...बहुमताला महत्त्व, मात्र निर्णय कायद्याला धरून, नार्वेकरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 9:44 AM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सूचक विधान केले आहे.

मुंबई : राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. त्यामुळे जनता आणि कायद्याला अपेक्षित असा निर्णय घेऊ, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सूचक विधान केले आहे.

भाजपच्या वतीने आयाेजित ‘पालावरची दिवाळी’ कार्यक्रमात नार्वेकर यांना आमदार अपात्रतेविषयी विचारले असता ते म्हणाले, राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात, परंतु आज दिवाळीच्या फटाक्यांवर बोलणे उचित राहील. राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे. लोकशाहीत असे निर्णय होत असताना संविधानिक चौकटीत व्हायला पाहिजेत. असे निर्णय शाश्वत ठरायला हवेत. हे निर्णय टिकून कसे राहतील, याचा विचार करणे अपेक्षित आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

सुनावणी २१ नोव्हेंबरला  

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी ३१ डिसेंबर ही तारीख आखून दिली आहे. त्याआधी सुनावणी पूर्ण करून निर्णय जाहीर करावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांना व्हीप मिळालाच नव्हता असा दावा करण्यात आला आहे. पुरावे, कागदपत्रे सादर करण्यास आता १५ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुढची सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

सरकार संवेदनशील आहे, विधिमंडळही संवेदनशील आहे. येत्या काळात आपण शाश्वत आणि टिकाऊ निर्णय घेऊ. त्याला विधिमंडळाची साथ मिळेल. राजकीयदृष्ट्या जनेतला न्याय मिळेल असा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कायद्यात असणाऱ्या तरतुदी, संविधानातील तरतुदींचे पालन केले जाईल. - राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष.

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षराहुल नार्वेकरएकनाथ शिंदे