Vidhanparishad: ओएसडी ते विधानपरिषद... श्रीकांत भारतीय आहेत देवेंद्र फडणवीसांचे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:29 PM2022-06-08T13:29:16+5:302022-06-08T13:30:02+5:30
भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे
मुंबई - राज्यात सध्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होईल. त्यासाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने जाहीर केलेल्या नावांमध्ये एक नाव ते म्हणजे श्रीकांत भारतीय. श्रीकांत भारतीय हे फडणवीसांचे स्वीय सहायक होते, त्यांना भाजपने संधी दिली आहे.
भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पत्ता यंदाही कट करण्यात आला. त्यामुळे, श्रीकांत भारतीय या नवख्या नावाची चर्चा सुरू आहे. तर, श्रीकांत भारतीय नेमके कोण, याचीही उत्सुकता अनेकांना लागली आहे.
विधान परिषदेच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. ते भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे ते प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
दरम्यान, यापूर्वी विधानसभा निवडणुकांवेळी औसा मतदारसंघातून भाजपने अभिमन्यू पवार यांना संधी दिली होती. त्यांनीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीसांचे ओएसडी म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे, अभिमन्यू पवार आणि श्रीकांत भारतीय असे दोन माजी ओएसडी विधिमंडळात दाखल होतील. त्यात, एक विधानसभेत तर दुसरे विधानपरिषदेत दाखल होतील.