Join us

Vidhansabha: अजित पवारांनी काकांशी गद्दारी करुनच शपथ घेतली होती; शिंदे गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 4:23 PM

आता शिंदे गटातील आमदारही चांगलेच संतापले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी आता राष्ट्रवादीवर पलटवार करताना अजित पवार यांच्या शपथविधीची आठवण करुन दिली. 

मुंबई - स्थगिती सरकार हाय हाय... महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी... आले रे आले गद्दार आले.. अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडल्याचे आज सकाळीच पाहायला मिळाले. या घोषणेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे हे अग्रस्थानी असल्याचं दिसून आलं. सरकारची तुलना गद्दार अशी केल्याने आता शिंदे गटातील आमदारही चांगलेच संतापले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी आता राष्ट्रवादीवर पलटवार करताना अजित पवार यांच्या शपथविधीची आठवण करुन दिली. 

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा... ईडी सरकार हाय हाय... या सरकारचं करायचं काय... खाली डोकं वर पाय... आले रे आले ५० खोके आले... खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणांनी विरोधकांनी विधानसभा परिसर दणाणून सोडला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली भूमिका अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी दाखवून दिली. त्यानंतर, आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं आहे. 

विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली. पण, राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करुनच शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. तसेच, सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.

धनंजय मुंडेंवर जोरदार प्रहार

धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार करताना गायकवाड म्हणाले, धनंजयची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत. जो लोकप्रतिनिधी आहे आणि याला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?. आम्ही गद्दार नसून खुद्दार आहेत, आमाच्यावर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीवाल्यांना नाही, अशा शब्दात धनंजय मुंडेंवर गायकवाड यांनी सडेतोड पलटवार केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला पैसे घेण्याची गरज नाही. राज्यात महिन्याभरापूर्वी यांची सत्ता असताना शेतकऱ्यांना मदत केली नाही. मात्र, आमच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत दिलीय, असेही गायकवाड यांनी सांगितले. 

आजपासून अधिवेशनाला सुरुवात

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने सरकारला धारेवर धरण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, ईडी सरकारविरोधात आक्रमकपणे लढणार असल्याचेही स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :अजित पवारशिवसेनाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदे