महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 54 जागांवर राजकीय आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 03:05 PM2019-09-21T15:05:23+5:302019-09-21T15:05:40+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला
महाजनादेश, जनआशीर्वाद, शिवस्वराज्य या यात्रा महाराष्ट्रभर फिरू लागल्यापासून ज्या घोषणेकडे सगळ्यांचेच कान लागले होते, ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. 2014 च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभानिवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून 21 ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर 3 दिवसांनी, म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 54 जागांवर आरक्षण पडले आहे. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवार येथून निवडणूक लढवतील.
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. दिवाळीच्या आधीच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यानं दिवाळीआधी विजयाचे फटाके कोण फोडतो आणि कुणाचे फटाके फुसके ठरतात, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या 54 मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभारतील. त्यामध्ये 29 जागा अनुसूचित जातींसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे 54 मतदारसंघातील उमेदवार हे आरक्षणाचा आधार घेत निवडणूक लढवणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - 31 ऑगस्ट 2019
8 कोटी 94 लाख 46 हजार 211 सामान्य मतदार
1 लाख 16 हजार 495 सर्व्हिस व्होटर
8 कोटी 95 लाख 62 हजार 706
मतदान केंद्र - 90 हजार 403 - 2014 मध्ये
मतदान केंद्र - 95 हजार 473 - 2019 मध्ये
1.8 लाख ईव्हीएम
1.39 लाख व्हीव्हीपॅट
29 अनुसूचित जाती
25 अनुसूचित जमातींसाठी
सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. यावेळी मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली असून त्यांचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. भाजपा आणि शिवसेनेचे नेते 'आमचं ठरलंय', असं म्हणत असले तरी त्यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्यानं युतीचं घोडं अडलं आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसींचा एमआयएम हे पक्ष 'वंचित बहुजन आघाडी'च्या झेंड्याखाली एकत्र लढले होते. परंतु, या आघाडीत बिघाडी झाली असून एमआयएमनं भारिप बहुजनशी 'काडीमोड' घेतला आहे.